(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चीन, पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही; शेतकरी आंदोलनावरुन राज ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा
"सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. त्याच काही त्रुटी असू शकतात निश्चित. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे.", असं राज ठाकरे म्हणाले.
नवी मुंबई : वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 2014 साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आज राज ठाकरे यांना जामीन मिळाला आहे. आज राज ठाकरे स्वत: वाशी कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. शेतकरी आंदोलनावरुन राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मला असं वाटतं आंदोलन जरा जास्तीच चिघळलं आहे. एवढं चिघळण्याची आवश्यकता नव्हती, असंही ते म्हणाले.
शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मला असं वाटतं आंदोलन जरा जास्तीच चिघळलं आहे. एवढं चिघळण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही जसं ऐकता किंवा व्हॉट्सअॅप आणि इतर गोष्टींवर पाहता, तसंच आम्हीदेखील पाहतो. शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत?, त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे... वगैरे... पण प्रश्न असा आहे की, त्यांच्या मागण्या काय आहेत? सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. त्याच काही त्रुटी असू शकतात निश्चित. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये कृषी खातं आहे. प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री वा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होतं. हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती. चीनच्या किंवा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत."
प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "कसं आहे शेवटी ताणताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत? एक 26 जानेवारी काय घेऊन बसला आहात तुम्ही यामध्ये…"
अगली बार ट्रम्प सरकार असं जाऊनही भाषणं करायची गरज नव्हती : राज ठाकरे
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्वीट रिहानाने केलं होतं. त्यासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "ती कोण बाई आहे. मला काही कळालं नाही. कोणतरी कुठेतरी बोलते आणि त्यावर सरकार उत्तर देतं तिला. मला सांगात ती ट्वीट करण्यापूर्वी तुम्हाला तरी माहिती होती का? जिच्या एका ट्वीटने तुम्ही सगळेजण तिला काहीतरी बोलताय वगैरे... वगैरे.. आणि इतर सगळे म्हणतायत की आमच्या देशाचा प्रश्न आहे. आम्ही सोडवू. तुला नाक खुपसायची गरज नाही. पण मग अगली बार ट्रम्प सरकार असं जाऊनही भाषणं करायची गरज नव्हती. त्यांच्या देशाचा प्रश्न होता." पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "प्रश्न असा आहे की, कोण मुलगी, कोणती गायिका, जिच्या ट्विटवर तुम्ही भारतरत्नांसारख्या लोकांना बोलायला सांगताय. हे बरोबर नाही."
पाहा व्हिडीओ : Raj Thackeray | कृषी कायदा, रिहाना आणि मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे म्हणतात...
अयोध्या दौऱ्याती तारिख अद्याप ठरलेली नाही : राज ठाकरे
अयोध्या दौऱ्यासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "अयोध्या दौऱ्याती तारिख अद्याप ठरलेली नाही. मी फक्त दौऱ्याची इच्छा व्यक्त केली होती. कधी जाणार ते मी कळवीनच तुम्हाला. ते काही लपून राहणार नाही." असं म्हणत राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वीज दराविरोधात सर्वात आधी मनसेनं आंदोलन केलं होतं : राज ठाकरे
"वीज दराविरोधात पहिलं आंदोलन मनसेनं केलं होतं. या आंदोलनात मनसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मला असं वाटतं की, नागरिकांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे की, यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं? वीज कंपन्यांकडून वाढीव बिलं सर्वांनाच येत आहेत. तुम्हाला लॉकडाऊनमध्ये त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही, त्यामुळे तुम्ही जर नागरिकांना त्रास देणार असाल तर कसं होईल? सर्वात आधी मंत्र्यांनी सांगितलं की, आम्ही वीज बिलांमध्ये कपात करु. त्यानंतर एकदम घुमजाव झालं. राज्यपालांनी सांगितल्यानंतर मी शरद पवारांशी बोललो. त्यांनी सांगितलं की, त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहा आणि ते पत्र माझ्याकडे पाठवा. मी त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी मला कळालं की, अदानी पवार साहेबांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली मला माहिती नाही. पण त्यानंतर सरकारनं निर्णय सांगितला की, वीज बिल माफ केलं जाणार नाही."
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मला निर्दयीपणा समजतंच नाही लोकांचा. एकतर पिळायचं लोकांना, त्यानंतर इतक्या निर्दयीपणे वागायचं. पैशांचा विचार करायचा नाही, अजून कशाचाही करायचा नाही. आणि वीजबिल माफ करणार नाही. हे यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय होणारच नाही. आणि या कंपन्यांसोबत चर्चा म्हणजे, काहीतरी लेनदेन झाल्याशिवाय चर्चा थांबणारच नाहीत. सगळ्या कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करतंय."
केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता होती, तेव्हा नांमांतरण का नाही झालं? : राज ठाकरे
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, "भाजप असो किंवा शिवसेना असो. ज्यावेळी केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता होती, तेव्हा नांमांतरण का नाही झालं? आज कसलं राजकारण करताय तुम्ही? इतर अनेक शहरांची नावं बदलली गेली. दिल्लीत तर रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात आणि राज्यात जेव्हा तुमचं सरकार होतं, त्यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? याचं उत्तर भाजपनंही द्यावं आणि शिवसेनेनंही द्यावं. लोकांना काय वेडे समजलात का? बरोबर निवडणुकांच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा, केला का नाही तुम्ही इतकी वर्ष?"