Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ धडधडणार... मशिदीवरील भोंगे की उद्धव ठाकरे, निशाणा कुणावर?
राज ठाकरे आज मनसेची भविष्यातील दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच मशिदीवरील भोंग्यावर ते आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा होत असून राज ठाकरे आज शिवाजी पार्कवरील सभेला संबोधित करणार आहेत. मशिदीच्या भोंग्याचा त्यांनी विषय या आधीच उचलला आहे, आज त्यावर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार तसेच मनसेच्या राजकीय भविष्याच्या दिशेबद्दल काय संकेत देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा होत असून संध्याकाळी 7.30 वाजता ते सभेला संबोधित करणार आहेत. आज सकाळी राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली. तेव्हापासून राज्यभरातून कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल होताना दिसत आहे. विशेषत: मुंबईतील शाखांतून आणि ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पालघर आणि पुण्यातील हजारो कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत.
आज शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात निनादणार पक्षाचं नवं स्फूर्तीगीत ! #मनसे_पाडवामेळावा @MNSAmeyaKhopkar pic.twitter.com/kgdLD2bf3g
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 22, 2023
राज ठाकरेंच्या भाषणातील संभाव्य मुद्दे कोणते?
येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून त्यासाठी मनसेने तयारी सुरू केली आहे. मनसेने या आधी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असून त्यावरून भाजपशी त्यांची जवळीकता वाढत असल्याचंही दिसून येतंय. राज ठाकरेंची आजची सभा ही मनसेच्या आणि राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल असं मत काहीजणांनी व्यक्त केलं आहे.
सौदी अरेबियात रमजानच्या महिन्यात मशिदीवरील भोंग्यावर बंदी आणली आहे, मग महाराष्ट्रात हा निर्णय का घेतला जात नाही अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. मनसेच्या टीजरमध्येही याची झलक दिसून आली. त्यामुळे राज ठाकरे आज मशिदींच्या भोंग्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज ठाकरे यांचा हा पहिलाच पाडवा मेळावा आहे. त्यामुळे ते काय बोलणार, कुणावर टीका करणार याकडे लक्ष लागलं आहे. तसेच शिवसेनेतील फूट आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेच्या वर्धापनदिनादिवशी राज ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला होता. राजकारणात भरती-ओहोटी ही असतेच, आज भाजपला भरती आली आहे, उद्या ओहोटी येईल असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज ते काय भूमिका घेतात त्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी वाचा: