Raj Thackeray Interview: राजकारणात यायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा; राज ठाकरे यांचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray Interview : "ज्यांची राजकारणात येण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. माझ्याच पक्षात या असं आमंत्रण नव्हते. जो आवडीचा पक्ष असेल त्यात काम करा, पण करा." असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.
Raj Thackeray Interview : "राजकारणाला तुच्छ मानून चालणार नाही. तुमचं आयुष्य राजकारणाभोवती निगडित आहे. ज्यांची राजकारणात येण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. माझ्याच पक्षात या असं आमंत्रण नव्हते. जो आवडीचा पक्ष असेल त्यात काम करा, पण करा", असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. मुंबईतील सायन रुग्णालयाच्या (Sion Hospital) मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित वसंतोत्सवात राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
माझ्याकडे रोज सकाळी ओपीडी : राज ठाकरे
राजकारणाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. फटके खाण्याची सहनशीलता तुमच्याकडे हवी. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, तुमचा संयम. निगरगट्ट होण्याची गरज नाही. तुम्हाला राजकारणात तुम्हाला प्रत्येक माणूस गुण दोषासह स्वीकारावा लागतो. सकाळी माझ्याकडे माणसं येतात त्याला मी ओपीडी म्हणतो. मला माझे अनेक मित्र फोन केल्यावर विचारतात ओपीडी चालू आहे का?
ज्यांना राजकारणात यायचं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा : राज ठाकरे
राजकारणात येण्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा पाहिजे. माझ्या पक्षाचं नाव समोर आणलं त्यावेळी मी नवनिर्माण हा शब्द जाणीवपूर्वक घातला. जर काही करायचं असेल तर नवीन काहीतरी निर्माण केलं पाहिजे. त्यासाठी राजकारणाचा उपयोग केला पाहिजे. सध्या ओरबाडणं सुरु आहे. ज्या ज्या लोकांना राजकारणात यायचं असेल तर त्यांनी खरंच यायला पाहिजे. राजकारणाला तुच्छ मानून चालणार नाही. तुमचं आयुष्य राजकारणाभोवती निगडित आहे. त्याला तुच्छ कसं मानता? राजकारणात माणसं वाईट असतील पण राजकारण वाईट नाही. जर वाईट असेल तर येऊन साफ करा. नाक मुरडून कसं होईल. ज्यांची मनापासून राजकारणात यायची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. माझ्याच पक्षात या हे आमंत्रण नव्हे. तुमचा जो आवडीचा पक्ष असेल त्यात काम करा, पण करा.
'मी अमितला राजकारणात आणू शकतो, लादू शकत नाही'
अमित ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशावर घराणेशाहीच्या प्रतिक्रिया येतात का, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, "मी अमितला राजकारणात आणू शकतो, लादू शकत नाही. बाप म्हणून त्याला आणण्याचं माझं काम आहे. स्वीकारायचं काम आहे तुमचं. स्वीकारा किंवा नाकारा. मी तुम्हाला जबरदस्ती करु शकत नाही. जगभरात अनेक आई-वडील आहेत त्यांनी आपली मुलं आणलं. काही यशस्वी झाली, काही यशस्वी झाले नाहीत. जनताच ठरवते काय करायचं.
मग दहा वर्षांपूर्वी दीपोत्सव सुरु केला : राज ठाकरे
10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दिवाळीचा सण होता. मी शिवाजी पार्क मैदानाकडे बघत होतो. मला भकास चित्र दिसलं, अंधार दिसतो. दिवाळीची ऊर्जा दिसत नव्हती. मग मी माझ्या सहकाऱ्यांना म्हटलं काहीतरी केलं पाहिजे. मग दहा वर्षांपूर्वी शिवाजी पार्कवर दीपोत्सव सुरु केला. आपले सण उत्साहाने साजरे झाले पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. त्यातून हा दीपोत्सव सुरु झाला. जसा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तसा माझ्या आजोबांनी सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरु केला.
फिल्म प्रोड्युस करणं माझं पॅशन : राज ठाकरे
फिल्म प्रोड्युस करायचं माझं पॅशन आहे. त्याचं काम सध्या सुरु आहे पण राजकारणामध्ये पूर्ण वेळ असेल, अस राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. तसंच माझ्यावर आत्मचरित्र किंवा बायोपिक नको असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Raj Thackeray Interview : मला इंजेक्शन सोडून काहीही द्या, डॉक्टरांच्या घोळक्यात राज ठाकरेंची मुलाखत