Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या घरी होणाऱ्या बैठकीत सरकारकडून कोण-कोण उपस्थित राहणार? दोन नावे आली समोर
Raj Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा सरकारचे प्रतिनिधी आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलप्रश्नावरुन (Toll) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर टोल आणि इतर मुद्दे मांडले. ठाणे पासिंग MH 04 च्या गाड्यांना मुंबईत टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर उद्या शुक्रवारी 13 तारखेला राज ठाकरेंच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत शासनाच्यावतीने कोण उपस्थित असणार याची नावे समोर आली आहेत.
राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ' या ठिकाणी, शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत आज झालेल्या बैठकीनंतर सरकारने घेतलेली भूमिका आणि मनसेची मागणी याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते. राज्य सरकारकडून राज ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी दोन नावे निश्चित करण्यात आली आहेत. शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता राज ठाकरे यांच्या घरी होणाऱ्या बैठकीत मंत्री दादा भुसे, राधेशाम मोपलवार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसच एमएसआरडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितले की, आजच्या चर्चेनंतर त्याच्या निर्णयापर्यंत येणं याच्यासाठी म्हणून उद्या (शुक्रवार, 13 ऑक्टोबर) सकाळी 8 वाजता माझ्या घरी बैठक आहे. त्या बैठकीत काय निर्णय होतो याबाबत मी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहेत. टोलबाबत कोणत्या गोष्टी होणार, काय निर्णय होणार हे मी उद्या सकाळी सांगणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या घराबाबतही चर्चा झाल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
राज ठाकरे बैठकीत कोणते मुद्दे मांडले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी टोल जवळ किंवा रस्त्यांवर टॉयलेट नाही. येलो लाइनचे नियम पाळले जात नाहीत. ट्रॅफिक असेल तरीही टोल घेतला जातो. गाड्यांची संख्या वाढत असताना टोलवसुली कमी कशी? यासाठी गाड्यांची संख्या मोजण्यासाठी व्हिडिओग्राफी करण्यात यावी. टोल घेऊनही रस्ते खराब असतात. रस्त्यावर अपघात झाला तर लगेच क्रेन, अँम्बुलन्स उपलब्ध होत नाही. रस्ते कर घेतला जातो तर टोल कर कशाला? असे अनेक सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बैठकीत मुद्दे मांडले.