Kirit Somaiya : बोगस तक्रारदार उभे केले, राऊतांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्रही खोटं; किरीट सोमय्याचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Kirit Somaiya on Neil Somaiya : ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांनी खोटे बोलून मुंबई उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाची फसवणूक केली, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांनी खोटे बोलून मुंबई उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाची फसवणूक केली, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी केला आहे. ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांनी 1 मार्च रोजी मुंबई सत्र न्यायालयात आणि 10 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. यामध्ये किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या ( Neil Somaiya ) यांच्या विरोधा तक्रार दाखल करण्यात आली होती. आयएनएस विक्रांत बचाव निधीमध्ये घोटाळा झाल्याप्रकरणी ही तक्रार दाखल केली होती. बोगस तक्रारदार उभे करत संजय राऊतांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र खोटं असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
बोगस तक्रारदार उभे केले - सोमय्या
तक्रारदार बोगस आहे. दोन महिने तक्रारदाराला शोधतोय. त्याचा पत्ता बोगस, फोन नंबर बंद आहे. तक्रारदार जिवंत आहे की, नाही खरा आहे की, बोगस हे फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनाच माहित आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. नील किरीट सोमय्या आणि त्यांच्या निकॉन इन्फ्राशी संबंधित वसई प्रकल्पाच्या विरोधात प्राथमिक चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले नाही. हे खोटेपणाशिवाय दुसरे काही नाही, असा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रारदार पंढरीनाथ शंकरराव साबळे यांच्याकडून आलेल्या तक्रारीवरून नील किरीट सोमय्या, निकॉन इन्फ्रा आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत होते. पंढरीनाथ शंकरराव साबळे यांनी सादर केलेल्या तथाकथित तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना केले.
शिवसेनेने सोमय्या पिता-पुत्रावर केले होते आरोप
शिवसेना नेते (ठाकरे गट) संजय राऊत यांनी फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये पत्रकार परिषदांच्या मालिका घेऊन दररोज घोषणा केल्या की "बाप बेटा जेल में जायेंगे". वसई प्रकल्प निकॉन इन्फ्रा कंपनीबाबत संजय राऊत यांनी नील किरीट सोमय्या, किरीट सोमय्या यांच्यावर अनेक आरोप केले, या संदर्भात आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत बचाव घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. याशिवाय राकेश वाधवान या एचडीआयएल पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपीकडून नील सोमय्या यांना 415 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान आयएनएस विक्रांत बचाव घोटाळा प्रकरणी पुरावे नसल्याने याचिका निकाली काढत मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांना दिलासा दिला होता.