विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 3 ऑगस्टपासून, मुख्यमंत्र्यांची माहिती
कोरोना व्हायरसच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 22 जूनला अधिवेशन घेणं शक्य नाही. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर 3 ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून नियोजित होते. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आता 3 ऑगस्टपासून घेण्याबाबत आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यानच्या काळात 3 ऑगस्टपूर्वी पुरवणी मागण्यासांठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आज विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन 3 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. नुकसान भरपाई, पंचनामे सुरु आहेत. रायगडला तात्काळ मदत केली आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या निकषात बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
कोकणातील नुकसानग्रस्त नागरिकांना मदत म्हणून प्रतिकुटुंब कपड्यांसाठी आणि भांड्यांसाठी 5 हजार रुपये देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. पडझड झालेल्या झोपड्यांसाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. आंबा, नारळ, फणस यांची झाडं नष्ट झाली आहेत, त्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. प्रतिकुटुंब पाच लीटर रॉकेल, भिजलेले धान्य बदलून देणार असल्याचंही अजित पवार यांनी दिली.
Monsoon Session विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या तीन ऑगस्टपासून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती