एक्स्प्लोर
तुमच्या खिशातले पैसे मोदी उद्योगपतींना देणार : राहुल गांधी
भिवंडी : रा. स्व. संघावर गांधीहत्येचा आरोप केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोदी उद्योगपतींचं कर्ज माफ करणार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.
'सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोदी बड्या उद्योगपतींचं कर्ज माफ करणार आहेत. मोदी केवळ 15 जणांचं सरकार चालवत आहेत' असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर कोर्ट परिसरातच राहुल गांधींनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.
'हजारो कोटी रुपये असलेली एक तरी व्यक्ती बँकेच्या रांगेत दिसते का?' असा सवाल गांधींनी विचारला. 'मोदींनी तुम्हाला रांगेत उभं केलं, मात्र तुमच्या खिशातले पैसे याच श्रीमंतांकडेच जाणार. सामान्य नागरिक रांगांमध्ये उभे राहून त्रस्त असताना तिकडे मोदी कधी हसत आहेत, कधी रडत आहेत', असा टोला राहुल यांनी हाणला.
'गांधीजींच्या विचारधारेनं देशाला स्वातंत्र्य मिळालं. माझी लढाई ही गांधीजींच्या विचारधारेसाठी आहे. देशात एकीकडे स्वातंत्र्याची विचारधारा आहे आणि दुसरीकडे पारतंत्र्याची विचारधारा आहे. मी ज्या विचारांशी लढत आहे, ते विचार देशाला झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा देश कोणापुढे झुकणार नाही', असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मानहानी खटल्याप्रकरणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. काँग्रेस नेते शिवराज पाटील यांच्या हमीवर राहुल गांधींना जामीन मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबद्दल केलेल्या विधानामुळे राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज भिवंडी कोर्टात सुनावणी झाली. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संघाच्या लोकांनीच महात्मा गांधींची हत्या केली, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यानंतर राहुल गांधींनी माफी मागावी नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असं संघाने म्हटलं होतं. मात्र राहुल गांधींनी माफी न मागितल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यावरील सुनावणीसाठी राहुल गांधी आज सकाळी दहा वाजता भिवंडी कोर्टात हजर राहिले होते. 1 सप्टेंबर रोजी राहुल गांधी म्हणाले होते की, “मी अब्रुनुकसानीच्या खटल्याचा सामना करण्यास तयार आहे. महात्मा गांधी हत्यासंदर्भातील माझ्या वक्तव्यातील प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे.” तक्रारदाराची अट गांधी हत्येच्या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी, तसंच यापुढे असं विधान करणार नाही, याची हमी द्यावी, तरच खटला मागे घेऊ, असं तक्रारदाराने कोर्टात सांगितलं. मात्र राहुल गांधींच्या वकिलाने पुढील तारखेची मागणी केली. काय आहे प्रकरण? 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, भिवंडी येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या लोकांचा हात होता, असा सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपावर आक्षेप घेत, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र हा खटलाच रद्द करावा, अशी याचिका राहुल गांधी यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. यानंतर राहुल यांच्या वकिलांनी त्यांना या सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. मात्र हायकोर्टाने ती मागणीही अमान्य करत, भिवंडी कोर्टातच दाद मागण्याचे आदेश दिले.संबंधित बातम्या
माफी मागा किंवा खटल्याला सामोरे जा, राहुल गांधींना कोर्टाने फटकारलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement