Priya Dut : आशिष शेलारांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त लढणार, जिंकण्यासाठी रणनीतीही तयार
Bandra West constituency: गेल्या पाच वर्षांपासून राजकारणापासून बाजूला असलेल्या प्रिया दत्त आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाल्या असून त्यांना विधानसभेसाठी तिकीट देण्यात येणार असल्याची माहित आहे.
मुंबई : गेल्या पाच-सहा वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त या पुन्हा एकदा पक्षात सक्रिय झाल्याचं दिसतंय. वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी प्रिया दत्त यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी भाजपचे आशिष शेलार हे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे वांद्रे पश्चिममधून हाय होल्टेज लढत होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
सन 2019 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रिया दत्त यांचा पराभव झाल्यानंतर पुढील पाच वर्षे त्या पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात दिसल्या नव्हत्या. यंदाच्या लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांना तिकीट नाकारण्यात आलं.
आशिष शेलारांच्या विरोधात निवडणूक लढवणार
प्रिया दत्त यांच्या जागेवरती मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना संधी देण्यात आली. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव करत वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत प्रिया दत्त यांना उतरवण्यात येणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त अशी निवडणूक आता वांद्र पश्चिममध्ये पाहायला मिळणार आहे.
काँग्रेसला मोठी आशा
लोकसभेसाठी वर्षा गायकवाड यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून चांगली मतं मिळाली होती. मात्र, भाजपच्या उज्ज्वल निकम यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून काही मतांची आघाडी मिळाली होती. उज्ज्वल निकम यांना 72593 मतं मिळाली तर वर्षा गायकवाड यांना 69 हजारांपेक्षा अधिक मितं मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसच्या या विधानसभा मतदारसंघात यश मिळण्याबाबतच्या आशा वाढलेल्या आहेत.
वांद्रे पूर्वच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा?
वांद्रे पश्चिमेची जागा प्रिया दत्त यांना सोडली तर वांद्रे पूर्वच्या जागेवरती ठाकरे गटाकडून दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व जागेवर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. आता, झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत विजय मिळला होता.
आता राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांना यावेळी मोठी आघाडी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर मविआला ही जागा जिंकण्याची आशा आहे. मात्र वांद्रे पूर्वची जागा विधानसभेला आपल्या पक्षाला मिळावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत.
ही बातमी वाचा :