उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगणाऱ्याला मनसेकडून 151 रुपयांचं बक्षीस
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंढरपुरात केलेल्या भाषणात विविध मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधाला. मात्र उद्धव ठाकरे भाषणात नेमकं काय म्हणाले हे कोणाला कळालं नसल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात केलेल्या भाषणावर मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण ज्यांना कळालं असेल, त्यांनी ते समजवून सांगितल्यास त्यांना योग्य बक्षीस दिलं जाईल, अशी टीका मनसेने उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंढरपुरात केलेल्या भाषणात विविध मुद्द्यांवरुन भाजपवर निशाणा साधाला. मात्र उद्धव ठाकरे भाषणात नेमकं काय म्हणाले हे कोणाला कळालं नसल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
"काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे म्हणते होते की आम्ही 25 वर्ष युतीत सडलो. आता म्हणत आहेत की भाजपसोबत युती करायची की नाही याचा निर्णय जनताच ठरवेल. तसेच आम्हाला कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये रस नाही, हे उद्धव ठाकरेंचं बोलणं न कळण्यासारखं आहे", असं संदीप देशपांडे म्हणाले.
"उद्धव ठाकरेंच्या पंढरपुरातील भाषणाचं जो कुणी विश्लेषण करेल आणि त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ आम्हाला समाजावून सांगेल, त्यांना मनसेकडून 151 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल", अशी घोषणाही संदीप देशपांडे यांनी यावेळी केली.
युती करायची की नाही हे जनताच ठरवेल
आगा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जागावाटप खड्ड्यात गेलं, आधी शेतकऱ्यांचं बघा. युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत दिला आहे. यावेळी त्यांनी दुष्काळ, राम मंदिर, कांदा प्रश्न, राफेल घोटाळा, पीकविमासह अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार फटकारे ओढले.
संबंधित बातमी
जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा : उद्धव ठाकरेंचं सरकारवर शरसंधान