हत्या झालेल्या लेकीचं दु:ख सारुन कुटुंबाकडून नेत्रदान
ठाण्यात प्राची झाडे या तरुणीची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली होती. प्राचीच्या मृत्यूनंतर तिचे डोळे दान करण्याचा निर्णय झाडे कुटुंबीयांनी घेतला.

मुंबई : दोन दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून ठाण्यात प्राची झाडे या तरुणीची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली होती. झाडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांनी आपलं सामाजिक भान जपलं आहे. आपलं दु:ख बाजुला सारून प्राचीच्या मृत्यूनंतर तिचे डोळे दान करण्याचा निर्णय झाडे कुटुंबीयांनी घेतला. प्राचीच्या डोळ्यांमुळे इतरांना दृष्टी मिळेन, यासाठी नेत्रदान केलं असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं.
ठाण्यातील आरटीओ कार्यालयासमोरील रोडवर शनिवारी सकाळी प्राचीची हत्या करण्यात आली होती. प्रेमाचा प्रस्ताव न स्वीकारल्याने आकाश पवार याने प्राचीवर चाकूने हल्ला केला होता. या हल्लात प्राची गंभीररित्या जखमी झाली होती. लोकांनी तातडीनं उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान प्राचीचा मृत्यू झाला होता.
हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपी आकाशचा पोलिसांनी कसून शोध घेतला. काही तासातच पोलिसांनी आकाशला भिवंडी येथून अटक केली होती. नौपाडा पोलीस ठाण्यात आकाशविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
प्राची ठाण्यातील कोपरी कॉलनीतीलन किशोरनगर परिसरात राहत होती. ठाण्यातील बेडेकर कॉलेजमध्ये कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षात ती शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये प्राची आणि आकाशची मैत्री झाली. आकाश प्राचीवर एकतर्फी प्रेम करू लागला होता. तो नेहमी तिचा आणि तिच्या मैत्रिणीचा पाठलाग करीत असे. आकाशच्या या त्रासाला कंटाळून दीड महिन्यापूर्वी प्राची व तिच्या मैत्रिणीनी कापूरबावडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्राचीच्या वडिलांनी केला आहे.























