Pooja Chavan Death Case | संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेल्या मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होता, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना वाचावण्याचा प्रयत्न झालाय, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण इतकं गंभीर असूनही अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. 20 दिवसानंतरही एफआयआर दाखल होत नाही याचा अर्थ काय? संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. माध्यमं आणि भाजपने हे प्रकरण लावून धरलं नसतं तर हे प्रकरण सरकारने दाबलं असतं, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात बदनामीचं षडयंत्र आहे. मात्र, भाजप संपूर्णपणे चित्रा वाघ यांच्या पाठीशी असल्याचेही ते म्हणाले.
राजीनाम्यानंतर संजय राठोड काय म्हणाले? मी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतो त्यातील बंजारा समाजाच्या एका मुलीने आत्महत्या केली. त्याचा संबंध माझ्याशी जोडून मला गुन्हेगार ठरवले. विरोधी पक्ष, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून माझी बदमानी करून मला राजकीय जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अनेकांना उसंत नव्हती, त्यामुळे मी बाजुला होऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राजीनामा दिला आहे, असे स्पष्टीकरण वनमंत्री संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांपुढे दिले.यावेळी राठोड यांच्यासोबत संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेनेचे नेते अनिल देसाई उपस्थित होते.
राठोड म्हणाले, ‘गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्ष, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून मला राजकीय जीवनातून उठविण्याचा घाणेरडा प्रयत्न केला. गेल्या 30 वर्षांपासून मी राजकीय जीवनात आहे. आज मला उद्ध्वस्थ केलं आहे. या प्रकरणाचा तपास होऊन जर मी दोषी निघालो असतो तर मी राजीनामा दिला असता. पण मला वेळ दिला नाही. त्यामुळे मी बाजुला होऊन या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. या प्रकरणाचा माझ्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनावर परिणाम झाला आहे. माझ्या समाजावरही परिणाम झाला आहे. आम्ही अधिवेशनच चालू देणार नाही, ही विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे सत्य बाहेर यायचे असेल तर चौकशी होऊ द्यावी लागेल.’
Sanjay Rathod Resign | राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...