(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'धूम स्टाईल बाईकर्स'वर होणार कारवाई; पोलिसांनी हाती घेतली मोहीम
धूम स्टाईलने म्हणजे अतिवेगात रायडिंग केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी बाईकर्सना भालीवली येथील टोलनाक्यावर दिली.
पालघर : गेल्या काही वर्षांपासून महामार्गावर धूम स्टाईल बाईकर्सचा सुळसुळाट झालेला असून, काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग वाहतूक पोलिसांनी अशा धूम स्टाईल बायकर्सना थांबवून रस्ते सुरक्षा व बाईकवरील नियंत्रण याबाबतचे धडे दिले.
धूम स्टाईलने म्हणजे अतिवेगात रायडिंग केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी बाईकर्सना भालीवली येथील टोलनाक्यावर दिली. भरधाव वेगाने दुचाकी चालवताना आढळल्यास वाहतूक पोलीस अशा बाईकर्सवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करून त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यांकरिता रद्द केला जाणार आहे. त्यामुळे आता अशा वाहतूक नियमांची पायमल्ली करून धूम स्टाईलने बाईक चालविणाऱ्या बाईकर्सवर वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारणार असल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.
स्वतःच्या सुरक्षिततेबरीबरीने इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेण्याचे आवाहन महामार्ग वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश दिंडे यांनी बाईकर्सना केले. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळी वाहतूक विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 40 पेक्षा अधिक बाईक रायडिंग करणाऱ्यांना रोखले. त्यांना रस्ते सुरक्षा, नियंत्रित वेग आदींबाबत महत्व पटवून दिले. गुलाबपुष्प देऊन त्यांना समज देण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गावर अशा अतिवेगवान धूम स्टाईल बाईक चालवणाऱ्यांचे अपघात होऊन अनेकांचे अपघातामध्ये प्राण गेले होते. त्या अनुषंगाने सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने कारवाईला आरंभ झाल्याचे दिसून आले आहे.
संबंधित बातम्या :