(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याणमध्ये अजित पवारांचा फोटो भाजपाच्या नेत्यांसोबत, अनेकांच्या भुवया उंचावल्या
बॅनरवर देवेंद्र फडणवीस, भाजपवासी झालेले गणेश नाईक आणि स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या फोटोंच्या सोबतच अजितदादांचाही फोटो लावण्यात आला होता. यामुळे साहजिकच कल्याणकरांच्या भुवया उंचावल्या आणि या बॅनरची चर्चा सुरू झाली.
कल्याण : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजितदादा पुन्हा एकदा भाजपच्या बॅनरवर झळकले आहेत. कल्याणमध्ये लागलेल्या एका बॅनरने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. कल्याणमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते.
या स्पर्धेसाठी लावलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस, भाजपवासी झालेले गणेश नाईक आणि स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या फोटोंच्या सोबतच अजितदादांचाही फोटो लावण्यात आला होता. यामुळे साहजिकच कल्याणकरांच्या भुवया उंचावल्या आणि या बॅनरची चर्चा सुरू झाली. मात्र अजित पवार हे कबड्डी असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असल्यानं त्यांचा फोटो लावल्याचं स्पर्धेचे आयोजक स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं आणि चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणींना या बॅनरमुळे उजाळा मिळाला.
अजित पवार महाराष्ट्र कबड्डी महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. म्हणून कार्यक्रमाच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो होता. या कार्यक्रमाला अजित पवारही येणार होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. हे खेळाचं व्यासपीठ होतं, त्यामुळे तेथे अजित पवारांचा फोटो लावण्यात आला होता, असं स्पष्टीकरण या स्पर्धेचं आयोजक भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिलं आहे.
हरणाऱ्यांनी पुन्हा जिंकण्याच्या उमेदीने मैदानात उतरा : देवेंद्र फडणवीसखेळात हरणाऱ्यांनी जिद्द सोडू नका, पुन्हा जिंकण्याच्या उमेदीने मैदानात उतरा, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. कल्याणमध्ये आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला फडणवीस यांनी आज हजेरी लावली होती. खेळात हार जीत ही होतच असते, जिंकणाऱ्यांना मी शुभेच्छा देतो, मात्र हरणाऱ्यांना मी जास्त शुभेच्छा देतो. कारण पुढच्या वेळी पुन्हा जिंकण्याची उमेद घेऊन मैदानात उतरा आणि बाजी मारा, असं फडणवीस म्हणाले. यावेळी कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी ते भाषण करत असले, तरी यातून भविष्यात भाजप कार्यकर्त्यांनी आणखी उमेदीने कामाला लागण्याचा आणि उमेद न सोडण्याचा संदेश फडणवीस यांनी दिल्याचं यानंतर बोललं जातंय.