PFI Ban: महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेणार? PFI नंतर या संघटनेवर बंदी येण्याची शक्यता
Raza Academy: केंद्राने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकार रझा अकादमीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.
Raza Academy: केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India-PFI) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून रझा अकादमीवर (Raza Academy) बंदी घातली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बंदीबाबत नवरात्रोत्सवानंतर निर्णय जाहीर करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही वर्षांपासून रझा अकादमी चर्चेत आहे.
सोशल मीडियावर भाजप समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समीत ठक्कर यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. ठक्कर हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्यासोबतही संपर्कात असल्याची चर्चा सुरू असते. समीत ठक्कर यांनी रझा अकादमीवर बंदी येणार असल्याचे ट्वीट केले आहे. त्यामुळे रझा अकादमीवर बंदी येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी याआधीदेखील रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. राज्यातील हिंसाचारामागे रझा अकादमी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
#Exclusive
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) September 29, 2022
*Acoording to top sources *
Maharashtra government under CM @mieknathshinde Ji & DCM @Dev_Fadnavis Ji is all set to Ban "Raza Academy" once the Navratra festival gets over.
समीत ठक्कर यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि नितीन राऊत यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टवरून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी ठक्कर तुरुंगात होते. हायकोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली.
रझा अकादमी आहे काय?
1978 मध्ये अलहाज मोहम्मद सईद नूरी यांनी रझा अकादमीची स्थापना केली होती. नूरी हे 1986 पासूनचे रझा अकादमीचे अध्यक्ष आहेत. रझा अकादमीचे इमाम-ए-अहमद रझा खान कादरी आणि इतर सुन्नी विद्वानांची पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. अकादमीने आतापर्यंत उर्दू, अरबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पुस्तके प्रकाशित केली आहेत.
रझा अकादमी ही आंदोलनांमुळेही चर्चेत आली आहे. 11 ऑगस्ट 2012 रोजी, रझा अकादमीने आसाममधील दंगली आणि म्यानमारमधील मुस्लिमांवरील हल्ल्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे इतर काही मुस्लिम गटांसह आंदोलन केले होते. या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला होता. यात दोन ठार आणि 50 हून अधिक जखमी झाले होते. नुकत्याच, काही महिन्यांपूर्वी अमरावतीत झालेल्या दंगलीतही रझा अकादमीचा हात असल्याची चर्चा होती.
त्याशिवाय, रझा अकादमीने संगीतकार ए.आर. रहमान आणि इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्याविरुद्ध मुहम्मदवर चित्रपट बनवल्याबद्दल फतवा जारी केला होता. त्याशिवाय, इतर काही मुद्यांवर रझा अकादमीने घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली असल्याचे दिसून आले.