(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या पार्टीत बॉलिवूडची गाणी वाजवताना परवाना घेणे अनिवार्य करा, हायकोर्टात याचिका
डान्स फ्लोअरवर थिरकण्यासाठी बॉलिवूडची फिल्मी आणि नॉन फिल्मी गाणी ही मुख्य केन्द्रबिंदू असतात. मात्र, जर फोनोग्राफिक परफॉर्मन्सचा परवाना नसताना अशी गाणी वापरली तर त्यामुळे संबंधित हॉटेल-पबवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असं उच्च न्यायालयाने नुकतच स्पष्ट केलं आहे.
मुंबई : दरवर्षी नाताळ आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या थर्टी फर्स्टनिमित्ताने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरी भागांत नागरिक मोठ्या संख्येने हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उत्साहाने जात असतात. त्यामुळे हॉटेल-पबमध्येही विविध प्रकारचे आकर्षक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सगळ्यांमध्ये डान्स फ्लोअरवर थिरकण्यासाठी बॉलिवूडची फिल्मी आणि नॉन फिल्मी गाणी ही मुख्य केन्द्रबिंदू असतात. मात्र, जर फोनोग्राफिक परफॉर्मन्सचा परवाना नसताना अशी गाणी वापरली तर त्यामुळे संबंधित हॉटेल-पबवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असं उच्च न्यायालयाने नुकतच स्पष्ट केलं आहे.
पीपीएल इंडिया ही संस्था स्वातंत्रपूर्व काळापासून म्हणजेच साल 1941 च्या दरम्यान निर्माण झालेली संस्था आहे. या संस्थेकडे साधारणतः 25 लाखांहून अधिक गाण्यांची नोंदणी असून हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांमधील गाण्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर 340 हून अधिक म्युझिक कंपन्यांसोबच त्यांचा करार झालेला आहे. त्यामुळे या गाण्यांचा खाजगी किंवा सार्वजनिक वापर करण्यासाठी संस्थेचे शुल्क आणि परवाना मिळणे अत्यावश्यक आहे. याबाबत संस्थेच्यावतीने गेल्यावर्षी यासंदर्भात उच्च न्यायलयात दावा करण्यात आला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने तो मान्य करत त्याला सहमती दिली होती. हाच आदेश यंदाही लागू करावा या मागणीसाठी पीपीएलच्यावतीने पुन्हा एकदा न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.
ज्या गाण्यांची मालकी या संस्थेकडे आहे ती गाणी विनापरवाना वाजवली जात असल्यानं कॉपीराईट हक्क कायद्याचा भंग केला जात आहे. त्यामुळे यंदादेखील याबाबत परवाने घेण्याची सक्ती लागू करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्यापुढे याबाबत नुकतीच सुनावणी झाली. या याचिकेवर 28 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.