व्हॉट्सअॅपवर सुंदर डीपी ठेवणाऱ्यांनो, सावधान!
प्ले स्टोअरवर आलेल्या एका अॅपमुळे तुमचे नंबर कुणाकडेही शेअर होऊ शकतात.

मुंबई : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. गूगल प्ले स्टोअरवर असं एक अॅप उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीनं तुमचा नंबर कुणालाही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनोखळी व्यक्ती तुमची डोकेदुखी बनू शकते. असाच अनुभव मुंबईच्या बोरीवलीतील एका महिलेला आला आहे.
बोरिवलीतल्या एका महिलेला एका अनोळखी व्यक्तीचा व्हॉट्सअॅपवर मेसेज आला होता. या व्यक्तीने त्या महिलेला आपले नग्न फोटो पाठवले होते आणि तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आपला नंबर या अनोळखी व्यक्तीकडे कसा पोहोचला? हाच प्रश्न या महिलेला पडला.
तब्बल 4 महिने या अनोळखी माणसाचे मेसेज या महिलेला सुरु होते. या व्यक्तीच्या मेसेजेसमुळे महिलेचं नवऱ्यासोबत भांडणं सुरु झालं होतं. अखेर 14 ऑक्टोबर रोजी त्या महिलेने थेट पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी अनस अन्सारी या 23 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपी अनसने पोलिसांना चौकशीत एक धक्कादायक माहिती दिली. त्याने एक मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं होतं. ज्याद्वारे हजारो अनोळखी लोकांचे फोन नंबर त्याच्या मोबाईलमध्ये अॅड झाले होते. अनसने त्यातील सुंदर डीपी असणाऱ्या महिलांना मेसेज करणं सुरु केलं होतं.
अशारीतीने आरोप अनस अन्सारीने अनेक महिलांना मेसेज केले आहेत. त्यापैकी जवळपास 35 महिलांना अनसला ब्लॉक केल्याचं आढळलं, अशी माहिती समोर येत आहे.






















