कुटुंबियांना मृत दाखवून इन्शुरन्सचे पैसे लाटणाऱ्यांना बेड्या
पोलिसांनी मुख्य आरोपी चंद्रशेखर याच्यासह स्मशानभूमीचा कर्मचारी तेजपाल मेहरोल, डॉ. इम्रान सिद्दीकी, डॉ. अब्दुल सिद्दीकी, चंद्रशेखरचा मुलगा नारायण आणि सून लक्ष्मी यांना अटक केली आहे. या सगळ्यात इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली असून त्या दिशेनं सध्या गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.
कल्याण : जिवंत व्यक्तींचं डेथ सर्टिफिकेट काढून इन्शुरन्सचे पैसे लाटल्याचा खळबळजनक प्रकार ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने उघड केला आहे. यातून इन्शुरन्स कंपनीची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली असून पोलिसांनी दोन डॉक्टरांसह सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या चंद्रशेखर शिंदे याने त्याचा पुतण्या जिवंत असताना त्याचं डेथ सर्टिफिकेट काढून 4 लाख 8 हजार रुपये लाटले. त्यानंतर अशाचप्रकारे त्याने त्याची पत्नी, मुलगा, सून, आणि इतर मिळून तब्बल 13 जणांचं डेथ सर्टिफिकेट काढलं आणि त्याद्वारे त्यांच्या इन्शुरन्सचे 81 लाख रुपये लाटले. तर आणखी 55 लाख रुपये काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मात्र हा प्रकार लक्षात आल्यानं चंद्रशेखरचा पुतण्या व्यंकटेश यानं गुन्हे शाखेकडे धाव घेतली आणि हे कारनामे उघड झाले. या कामात मुंब्र्याचे दोन एमबीबीएस डॉक्टर आणि मुंब्रा स्मशानभूमीत काम करणारा महापालिकेचा कर्मचारी यांचाही सहभाग होता.
त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी चंद्रशेखर याच्यासह स्मशानभूमीचा कर्मचारी तेजपाल मेहरोल, डॉ. इम्रान सिद्दीकी, डॉ. अब्दुल सिद्दीकी, चंद्रशेखरचा मुलगा नारायण आणि सून लक्ष्मी यांना अटक केली आहे. या सगळ्यात इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली असून त्या दिशेनं सध्या गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.