(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई; राकेश आणि सारंग वाधवान यांची 31.50 कोटीची मालमत्ता जप्त
Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने आज मोठी कारवाई केली. राकेश आणि सारंग वाधवान यांच्या 31.50 कोटीच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली.
Patra Chawl Scam: शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आरोपी असलेल्या पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणात आज ईडीने (ED) कारवाई केली. सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवन यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर असलेली 31.50 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता मुंबई आणि गोवा येथील आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला पत्रा चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाची जबाबदारी देण्यात आली होती. यामध्ये 672 भाडेकरूंचे पुनर्वसनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संबंधित काळात, राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि इतर जण गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. करारानुसार, विकासकाने 672 भाडेकरूंना सदनिका उपलब्ध करून द्यायच्या होत्या आणि म्हाडासाठी काही सदनिका द्यायच्या होत्या. त्यानंतर उर्वरित राहिलेल्या क्षेत्रात विकसकाने जागेचा विकास करून त्यातील फ्लॅट्सची विक्री करायची होती.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन्सच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 विकासकांना एफएसआय विकून सुमारे 901.79 कोटी रुपये जमा केले. मात्र, 672 भाडेकरू आणि म्हाडाला कोणतीही जागा, फ्लॅट्स देण्यात आले नाहीत. त्याशिवाय, वाधवान संचालक असलेल्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने देखील 'मीडोज' (‘Meadows) नावाचा एक गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला आणि फ्लॅट खरेदीदारांकडून सुमारे 138 कोटी रुपये इतकी बुकिंग रक्कम जमा केली. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी बेकायदेशीर कामांमधून अंदाजे 1039.79 कोटींची रक्कम जमा केली असल्याचे ईडीने म्हटले आहे.
तपासादरम्यान, ही रक्कम राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवन यांनी एचडीआयएल आणि तिच्या समूह कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली. त्यानंतर विविध कंपन्यांच्या मार्फत ही रक्कम आपल्या वैयक्तिक खात्यात वळवली असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
2011-2016 या कालावधीत, राकेश वाधवन यांच्या खात्यातील 38.5 कोटी रुपयांचे पीओसी इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स लि. कडून घेतलेल्या रु. 28.5 कोटी कर्जाच्या हप्त्यांच्या पूर्व-पेमेंटसाठी वापरण्यात आले. हे कर्ज फ्लोटिंग व्याजावर घेण्यात आले होते. या कर्जातून 2011 मध्ये उत्तर गोव्यात 31.50 कोटी किमतीचे 1250 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 2 भूखंड आणि 15300 चौरस मीटरचा भूखंड सारंग वाधवान यांनी वैयक्तिक खात्यातून खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी ईडीने त्यांना अटक केली होती. जवळपास तीन महिने राऊत तुरुंगात होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. राऊत यांना जामीन देताना कोर्टाने ईडीच्या तपासावर ताशेरे ओढले होते.