Paper Leak : पेपरफुटी प्रकरणात राज्यातील विद्यमान मंत्र्यांचा समावेश; भाजप आमदार प्रसाद लाड यांचा दावा
Paper Leak : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.
TET Exam Scam : राज्यात उघडकीस येत असलेल्या पेपरफुटी प्रकरणावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याचा सहभाग असल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. या संदर्भातील पुरावे पटलावर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात आजपासून सुरू होत असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात पेपरफुटीचे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी खळबळजनक दावा करत या घोटाळ्यात मंत्र्याचा समावेश असल्याचे सांगितले. लाड यांनी सांगितले की, पेपरफुटी प्रकरणात मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा समावेश आहे. आम्ही यासंदर्भातील पुरावे पटलावर ठेऊ. या प्रकरणात गृहनिर्माण मंत्री, शिक्षण मंत्री यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
प्रसाद लाड यांनी म्हटले की, पेपरफुटी प्रकरणात आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. जर सरकारने सीबीआय चौकशी मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर मंत्र्यांचा दबाव असल्याचा दावा लाड यांनी केला आहे.
दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई सुरूच आहे. पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी नावाच्या व्यक्तीला लखनऊमधून अटक केली आहे. सौरभ त्रिपाठीची 'विनर' नावाची कंपनी आहे. या कंपनीने 2017 साली शिक्षण परिषदेचे परीक्षा घेण्याचे कंत्राट जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीला मिळवून देण्यासाठी लायझनिंगचे काम केले होते.
म्हाडा पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या तपासात इतर परीक्षांमध्ये घोटाळा झाला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी अधिक तपास करत इतर आरोपींना अटक केली. म्हाडा भरती, आरोग्य भरती त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेतही घोटाळा झाला असल्याचे समोर आले. पुणे पोलिसांनी या प्रकरणात काही बड्या अधिकाऱ्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. बीडमधील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे, महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे, जी. ए. टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार यांना म्हाडा भरती, शिक्षक पात्रता परिषद घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे.