Panvel Budget 2022-23 : कोणतीही करवाढ न करता, सिडको क्षेत्रातील गावे, शहरांच्या पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी 2022-23 वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे बुधवारी सादर केला. चालू अर्थसंकल्पातील आरंभीच्या 1 कोटी 80 लाख रूपयांच्या शिल्लकीसह सन 2022-23 या आर्थिक वर्षांसाठी 1 हजार 499 कोटी रूपये जमा तर 1 हजार 497 कोटी रूपयांच्या शिल्लकीचे अंदाजपत्रक आहे.


पनवेल महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आकड्यात दरवर्षी मोठे चढउतार पाहायला मिळतात. महापालिकेला मालमत्ता करातून उत्पन्न मिळणारे हे पहिलेच वर्षे असल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेचे वेगळेपण काय असेल याबाबत उत्सुकता होती. पंतप्रधान आवास योजना वगळता एकही नव्या प्रकल्पाचे नियोजन न करता महापालिकेचा अर्थसंकल्प दुपट्टीपेक्षा अधिक कोटींनी वाढल्याचे समोर आले आहे. गतवर्षीची म्हणजेच 2021-22 चा अर्थसंकल्प 772 कोटी रूपयांचा होता. तर यंदाचा अर्थसंकल्प तब्बल दीड हजार रूपयांपर्यंत पोहचला आहे. पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी पुनर्विकासासाठी 205 कोटी रूपये आणि मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न 629 कोटी रूपये वसूल होईल, असा अंदाज या अर्थसंकल्पात गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प वाढल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.


महापालिकेने भविष्यात साथरोगाचे संकट आल्यास महापालिकेच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळावे म्हणून ई लर्निंग संगणक प्रशिक्षण सेवेसाठी तीन कोटी रूपयांची तरतूद केली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासोबत शिक्षणासाठी 21 कोटी रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. सिडकोकडून हस्तांतरीत झालेल्या भूखंडाचा विकास करणे महापालिकेचे ध्येय राहिल. यामध्ये बगीचा, बाजार, मैदाने आदींचा समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली. सिडको क्षेत्रातील गावांना पायाभूत सोयीसुविधा पुरवून सिडकोकडून हस्तांतरीत होणारे नोडची देखभाल दुरूस्ती करणे देखील महापालिकेपुढे आव्हान असणार आहे.


हे ही वाचा - 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live