नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका हळूहळू जवळ येत आहेत. विविध महापालिकांसाठी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांपूर्वी 41 पॅनेलमध्ये एकूण 122 प्रभाग बनविण्यात आले आहेत. दरम्यान नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या या प्रारूप प्रभाग रचनेत असलेल्या त्रुटींबाबत हरकतींचा पाऊस पडत आहे. 122 नगरसेवक वाॅर्डसाठी 3 हजार 800 हरकती समोर आल्या आहेत. 


प्रभाग रचना करताना नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात घोळ घालून ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला असून सर्वात जास्त अर्ज त्यांनीच केले आहेत. यंदाच्या निवडणूकीसाठी 11 वाॅर्ड नव्याने वाढले आहेत. मात्र ते वाढवताना शहराच्या 20 टक्के लोकसंख्येत पाच वाॅर्ड आणि राहिलेल्या 80 टक्के लोकसंख्येत 6 वार्ड अनैसर्गिकरित्या वाढले आहेत. गावांच्या सीमाही तोडण्यात आल्या आहेत. एकाच सोसायटीमधील इमारती तोडून दुसऱ्या प्रभागात टाकणे, तब्बल 9 किलोमीटरचा एक प्रभाग बनवणे आदी गंभीर चुका अधिकार्यांनी केल्या असल्याचा आरोप भाजपा आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. याबाबत केलेल्या हरकती मान्य करून चुकीची दुरूस्ती न केल्यास भाजपा महानगर पालिका प्रशासन, निवडणूक आयोगाच्या विरोधात हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा भाजपा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.


हे ही वाचा - 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live