भावाला बघायला धावून आल्या बहिणी; धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी पंकजा-प्रीतम मुंडे ब्रीच कँडीत
Pankaja And Pritam Munde meet Dhananjay Munde : भाऊ धनंजय मुंडे दवाखान्यात अॅडमिट झाल्याची माहिती कळताच पंकजा आणि प्रीतम या दोन्ही बहिणी त्यांना पाहायला धावून आल्या.
Pankaja And Pritam Munde meet Dhananjay Munde : राजकारणात कितीही कटुता आली तरी नाती ही महत्वाची असतात. प्रत्येक सुख-दुःखात राजकीय वैर बाजूला ठेवून अनेक जण जवळ येत असल्याची उदाहरणं आपण पाहत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अशी उदाहरणं आपण पाहिली आहे. मुंडे बंधू भगिनींच्या बाबतही आपण हे पाहिलं आहे. आजही भाऊ दवाखान्यात अॅडमिट झाल्याची माहिती कळताच पंकजा आणि प्रीतम या दोन्ही बहिणी त्यांना पाहायला धावून आल्या.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकृती अस्वाथ्यामुळं दवाखान्यात भर्ती आहेत. त्यांना भेटायला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे पोहोचल्या. त्यांनी धनंजय मुंडेंची बराच वेळ भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. भावाची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला ही चुकीची बातमी आहे. त्यांना भोवळ आली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विकनेस आला होता. आता त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. आता ते व्यवस्थित आहेत. आम्ही त्यांना भेटलो आणि बोललो, ते रिकव्हर होत आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
धनंजय तू आराम कर - अजित पवार
धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, येत्या तीन - चार दिवसात त्यांना आराम मिळेल, असेही अजितदादा पवार म्हणाले. काल धनंजय मुंडे जनता दरबारास उपस्थित होते, त्यानंतर पवार साहेबांना भेटले, या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपली होती, असेही अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'धनंजय तू आधी बरा हो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून यशस्वी करू;' असा स्नेहाचा सल्लाही धनंजय मुंडे यांना दिला.
खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र शिंगणे, पार्थ दादा पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, महापौर किशोर पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशी केली.
संबंधित बातम्या
Dhananjay Munde News : अजित पवारांनी दिलं धनंजय मुंडेंच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट, म्हणाले...