पालघर : पश्चिम रेल्वेच्या सफाळे आणि केळवेरोड दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेस ट्रेनखाली सात वर्षीय लेकीसह आईने आत्महत्या केली. मंगळवारी (3 मे) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घडली. तृप्ती आरेकर (वय 30 वर्षे) असं आईचं नाव असून जिगीशा आरेकर (वय 7 वर्षे, मुलगी) असं मुलीचं नाव आहे. त्या पालघरमधील पोफरण (अक्करपट्टी) इथल्या रहिवासी होत्या.


या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आई आणि मुलगी असे दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिले.




या मायलेकीने मंगळवारी रात्री मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेस ट्रेनखाली आत्महत्या केली. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एका दुचाकीसह रुळामध्ये पडलेले आधार कार्ड आणि मोबाईल फोन आढळून आले. मात्र मोबाईल फोनमधील सिम कार्ड आधीच काढून फेकून देण्यात आले होते. तर आधार कार्डवरील माहितीवरुन त्यांची ओळख पटल्याने रात्री उशिराने सफाळे रेल्वे पोलीस ठाण्यात नातेवाईक पोहोचले.


मायलेकीने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सफाळे रेल्वे पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या काही काळ रोखून ठेवण्यात आल्या होत्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या