कल्याण : लता बनसोले या एम एस एफ महिला जवानाने २६ डिसेंबर २०२० रोजी प्रसंगावधान दाखवून एका व्यक्तीचे प्राण वाचवले. ही व्यक्ती अचानक चक्कर येऊन पडली. लता यांनी क्षणाचा विलंब न लावता आपला जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे रुळावर धाव घेऊन ट्रेन थांबविली आणि प्रवाशांच्या मदतीने त्या इसमाला उचलून रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार दिले. जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडलेल्या लता यांच्या धाडसाची दखल एबीपी माझाने घेत त्यांना शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे.
लता बनसोले या बदलापूरमधील रहिवासी असल्या तरी त्यांचे बालपण भुसावळमध्ये गेले आहे. पॉलिटिकल सायन्स या विषयात एमएचे पदवी घेतलेल्या लता यांच्या घरापासून जवळच अमळनेर पोलीस चौकी होती. काही कामानिमित्त दररोज या पोलीस चौकीसमोरून ये जा करताना त्यांच्या मनात लहानपणापासूनच पोलीस होण्याची इच्छा निर्माण झाली. 2014 मध्ये त्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मात्र तरीही खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. यानंतर 2015 मध्ये त्यांचे निरंजन यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतरही त्यांचे वास्तव्य भुसावळमध्येच होते. याच दरम्यान त्यांना मुलगा देखील झाला. अखेर दोन वर्षांनी 2017 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
त्यांना महराष्ट्र सुरक्षा फोर्समधून निवड झाल्याचा कॉल आला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तत्काळ त्यांनी भुसावळमधून बदलापूर गाठले. तिथेच स्थायिक झाले. त्यांच्या पती निरंजन यांनी देखील पत्नीच्या पाठीशी भक्कम उभे राहत आपल्या नोकरीला राजीनामा देत बदलापूर गाठले.
2017 साली खाकी युनिफॉर्म चढवून त्यांनी सायन रुग्णालयात ड्युटीचा पहिला दिवस उजाडला. आपल्या पेशाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी तेव्हाच केला होता. मात्र ड्युटी जॉइन केल्यानंतर काही महिन्यातच वेतनवाढीसाठी सुरक्षा फोर्स मधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. मात्र 14 ऑगस्ट 2018 रोजी नशिबाने त्याना साथ दिली आणि त्या पुन्हा एकदा सेवेत रुजू झाल्या. त्यांना रेल्वे स्थानकावर ड्युटीसाठी नेमण्यात आले. सुरुवातीला दादर ते चर्चगेट आणि त्यानंतर मुंबई सेंट्रल ते ग्रांट रोड आणि महालक्ष्मी दरम्यान त्या ड्युटी करतात. प्रवाशाची सुरक्षा महत्वाची मानणाऱ्या आणि आपल्या पेशाशी इमान राखणाऱ्या लता बनसोडे त्या दिवशी ग्रांट रोड स्थानकात ड्युटी करत असताना त्यांनी दाखविलेल्या शौर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या धाडसाची दखल करत लता याना शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
लता यांना आई वडील तसेच पतीकडूनही पाठिंबा व प्रोत्साहन मिळाले. एकीकडे कुटुंब व नोकरी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र पती निरंजन यांनी खूप मदत होते. कुटुंबाच्या पाठीब्यामुळेच आपण हे धाडस करू शकलो असा विश्वास त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.
संबंधित बातम्या :