Raj Thackeray Tweet : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे लावले जात असताना राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेबांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका मांडली आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला असल्याची चर्चा आहे. याआधी मंगळवारी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण करण्याबाबत आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार की शरद पवार यांचे ऐकणार असा सवाल केला होता. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. 


 







दरम्यान, मनसेच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शहरात विविध ठिकाणी स्वत: भेट देत आढावा घेतला आहे. तर, काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 


ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25  कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.