Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांचे प्राचीन ट्वीट जरी टाकले तरी त्यांनी आम्हाला बाळासाहेब समजावू नये. आजही आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांनी चालतो असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसेला सुनावले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यावर संजय राऊत यांनी भूमिका मांडली. 


संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनसेचे नाव न घेता टीका केली. यावेळी त्यांनी राज्यात शांतता असून कोणतेही आंदोलन झाले नसल्याचा दावा केला आहे. राऊत यांनी म्हटले की,  बाळासाहेबांनी भोंगे, नमाज याबाबत भूमिका घेतली, सत्ता आल्यावर नमाज त्यांनी बंद केले. बाळासाहेबांनी रस्त्यावरील नमाजावर तोडगा काढला आणि त्यानंतर रस्त्यावरील नमाज बंद झाले. भोंगे बाबत देखील सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि भोंगे बंद झाले असल्याचे त्यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या जुन्या कॅसेट पाठवतो त्यांनी बाळासाहेब समजवून घ्यावे असा टोला राऊतांनी लगावला. 


संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबात उपवस्त्र म्हणून राहत आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये असेही संजय राऊत यांनी म्हटले.


मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यावर आंदोलन व्हावे अशी परिस्थिती नाही, सर्वांनी परवानगी घेतली आहे, त्यामुळे कारवाई करण्याची गरज नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. हाच नियम मंदिर, चर्च सर्वांना आहे. समान नागरी कायदा असावा अशी मागणी असेल तर प्रत्येकाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार काम करावे असेही त्यांनी म्हटले. 


आंदोलन फक्त प्रसिद्धीसाठी आणि चिथावणीसाठी नसतात. शिवसेना गेली 50 वर्षे आंदोलन करत आहे. काही लोक राजकारणात हवशे नवशे गवशे असतात, त्यांच्यासाठी हे ठीक असल्याचा टोला राऊत यांनी मनसेला लगावला. 


मंदिरावरील भोंगे बंद करणार का?


आमचे मंदिरावरील भोंगे बंद करायचे का? आमचे कीर्तन सुरू असतात, ते बंद करायचे का? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांनी कधीच म्हंटले नाही की मंदिरावरील भोंगे बंद करा असेही राऊत यांनी सांगितले.