Coronavirus : कोरोना काळात मास्क न घातलेल्या मुंबईकरांकडून 55 कोटींहून अधिक दंडाची वसूली, दंडाच्या रकमेतून किती लस मिळतील?
मुंबई महापालिकेने 23 मे पर्यंत 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे.गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासूनची ही दंडाची रक्कम आहे.
मुंबई : कोरोना संकटात मुंबई महापालिकेने मुंबईत कोरोना संबंधींचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. मुंबई महापालिका, पोलीस आणि रेल्वेने मिळून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांकडून 55 कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासूनची ही दंडाची रक्कम आहे.
मुंबई महापालिकेने 23 मे पर्यंत 55 कोटी 56 लाख 21 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. त्यात मुंबई पोलिस आणि रेल्वेने वसूल केलेल्या दंडाचा समावेश आहे. महानगरपालिकेअंतर्गत 23 मे पर्यंत अधिकाऱ्यांनी 48 कोटी 28 लाख 80 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या गस्ती दरम्यान 6 कोटी 77 लाख 01 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. कोविड प्रकरणात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणून रेल्वेला मानले जाते. रेल्वेने देखील 50 लाख 39 हजार 200 रुपये दंड वसूल केला आहे.
Mumbai | Over Rs 55 crores collected in fine for not wearing face masks since April 2020: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/MxCVTeVW2i
— ANI (@ANI) May 24, 2021
मुंबईत वसूल केलेलया दंडात किती लस येतील?
मुंबईत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून वसूल केलेली दंडाची रक्कम लसीकरणासाठी वापरली तर लाखो नागरिकांचं लसीकरण होईल. कोरोना लसीचे सरकारी दर पाहिले तर सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड लस 300 रुपयांचा तर भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस 400 रुपयांना मिळत आहे. दोन्ही लसीची सरासरी किंमत 350 रुपये होते. दंडाची रक्कम 55,56,21,800 रुपयांमध्ये 350 रुपयांनी कोरोना लसीचे 15 लाख 87 हजार 490 डोस उपलब्ध होऊ शकतील.
मुंबईत गेल्या 24 तासात 1,057 रुग्णांची नोंद
मुंबईत मागील 24 तासात 1,057 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1312 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 53 हजार 998 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 334 दिवसांवर गेला आहे. मुंबई गेल्या 24 तासात 21 हजार 947 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी 1057 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईत सध्या 28 हजदार 86 अॅक्टिव रुग्ण आहेत. आज मुंबईत 48 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबई 14 हजार 671 रुग्णांनी जीव गमावला आहे.