मुंबई : लॉकडाऊन नंतर नागरिकांना भरमसाठ वीज बिल येण्याचे प्रकार काही भागात झाले होते. त्यामुळे वाढून आलेलं बिल कमी करण्यासाठी व बिल भरण्यासाठी महावितरण कार्यालयात लोक गर्दी करत होते. त्रस्त नागरिकांच्या  या मानसिकतेचा फायदा एका भामट्याने उचलला. या भामट्याने अनेक नागरिकांकडून बिल कमी करून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले. एवढेच नाही तर महावितरणला बोगस चेक देखील दिला. हा चेक बाऊन्स झाल्यानंतर या भामट्याचे बिंग फुटले. अखेर साहिल पटेल नावाच्या भामट्याला कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली.  


लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून काही महिने वीज बिल घेतले नव्हते. लॉकडाऊन नंतर महावितरणकडून थकीत वीज बील आकारणी सुरु केली. त्यामुळे ही बिले कमी करण्यासाठी व भरण्यासाठी लोक महावितरण कार्यालयात रांगा लावत होते. याच गर्दीत एक तरुण काही लोकांना भेटला. ही बिले कमी करून देतो, महावितरणमध्ये माझी ओळख आहे असे सांगत जवळपास 23 जणांकडून बिल भरण्यासाठी रक्कम घेतली. एवढेच नव्हे तर महावितरणमध्ये बिल भरण्यासाठी स्वतःच्या खात्याचा चेक दिला. मात्र हा चेक बाऊंस झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी ही बाब समोर आली. 


या प्रकरणी मार्च 21 मध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात काही लोकांनी तक्रार केली. सात महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी साहिल पटेल याला शोधून अटक केली. त्याने अजून अशा प्रकारे किती जणांना फसवले आहे  का? याचा पोलीस तपास करत आहेत अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी डी. एन. ढोले यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या