मुंबई : गोमांस तस्करीच्या संशयातून एका ट्रकचा पाठलाग करत असताना दोन प्राणी प्रेमींवर चाळीस ते पन्नास जणांनी हल्ला केल्याची घटना कुर्ला कसाईवाडा येथे घडली आहे. या हल्ल्यात आशिष कमलाकांत बारीक आणि प्रतीक ननांवरे हे गंभीर जखमी झाले आहेत. 


गोमांस तस्करीचा संशय आल्याने कमलाकांत बारीक आणि प्रतीक ननांवरे हे पोलिसांच्या गाडीतून जनावरे असलेल्या गाडीचा पाठलाग करत होते. या वेळी 40-50 जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी पोहोचले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांपैकी सात जणांना ताब्यात घेतले आहे. 


दरम्यान, या प्राणी प्रेमींबरोबर असलेल्या पोलिसांवर देखील हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींवर हत्येचा प्रयत्न, दंगल माजवणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती चुना भट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देसाई यांनी दिली.


या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिष कमलाकांत बारीक आणि प्रतीक ननांवरे यांना उपचारासाठी रूग्णलायात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत प्राणी प्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणी प्रेमी आणि विविध प्राणी  प्रेमी संघटनांतून होत आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.  


महत्वाच्या बातम्या