मुंबईत रेल्वे अपघातात एकाच दिवशी 16 जणांचा मृत्यू, तर 13 जखमी
कुर्ला, ठाणे , डोंबिवली , कल्याण, वाशी, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली आणि वसई अशा विविध स्थानकांवर हे अपघात झाले. रेल्वे रुळ ओलांडताना सर्वात जास्त अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल डेडलाईन झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गुरुवारी 18 जुलै रोजी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर विविध अपघातात एकूण 16 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे.
गेल्या महिन्यात 26 जून या दिवशी एकाही प्रवाशाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला नाही, तो रेल्वेच्या गेल्या काही वर्षातील महत्त्वाचा दिवस ठरला होता. मात्र 18 जुलैला पुन्हा 16 जणांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला आणि 13 प्रवासी गंभीर जखमी झाल्याने मुंबई लोकलचा प्रवास किती जीवघेणा आहे हे समोर आलं आहे.
कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली आणि वसई अशा विविध स्थानकांवर हे अपघात झाले. रेल्वे रुळ ओलांडताना सर्वात जास्त अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातातील 8 मृत प्रवाशांची ओळख पटली असून इतर 8 जणांची अजूनही ओळख पटली नाही.
रेल्वे स्थानक आणि मृतांचा आकडा
कुर्ला - 3 ठाणे - 3 डोंबिवली - 2 कल्याण - 2 वाशी - 1 पनवेल - 1 मुंबई सेंट्रल - 1 वांद्रे - 1 बोरिवली - 1 वसई - 1