खाजगी रुग्णालयातील 10 आयसीयू बेडसह किमान 100 खाटा ताब्यात घ्या, महापालिका आयुक्तांचे निर्देश
या कार्यवाहीमुळे मुंबई महापालिकेच्या 24 विभाग कार्यालयांकडे प्रत्येकी 100, याप्रमाणे एकूण 2 हजार 400 खाटा उपलब्ध होणार आहेत. यात 240 एवढ्या संख्येतील अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश असणार आहे.
मुंबई : 'कोविड कोरोना 19' या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय सेवा-सुविधांचा अधिकाधिक परिपूर्ण उपयोग होण्यासह अधिकाधिक सुयोग्य समन्वयन साधणे गरजेचे आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील नर्सिंग होम व छोटी रुग्णालये यातील किमान 100 खाटा उपलब्ध करून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
तसेच यापैकी किमान 10 टक्के खाटा या अतिदक्षता विभागातील (ICU) असाव्यात, असेही आदेशित करण्यात आले आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये प्रत्येकी 100, यानुसार किमान 2 हजार 400 खाटा उपलब्ध होणार आहेत. खाटा उपलब्ध करून घेताना त्या वेगवेगळ्या छोट्या रुग्णालयांमधील वा नर्सिंग होममधील असणार आहेत. उदाहरणार्थ एका नर्सिंग होममधील 50 खाटा, तर दुसऱ्या एखाद्या छोट्या रुग्णालयातील 50 खाटा याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या खाटा ताब्यात घ्यायच्या आहेत.
यानुसार प्रत्येक विभागाने किमान 100 खाटा ताब्यात घ्यायच्या आहेत. तसेच उपलब्ध होणाऱ्या खाटांपैकी 10 टक्के खाटा, या अतिदक्षता विभागातील खाटा असणे आवश्यक आहे. या कार्यवाहीमुळे मुंबई महापालिकेच्या 24 विभाग कार्यालयांकडे प्रत्येकी 100, याप्रमाणे एकूण 2 हजार 400 खाटा उपलब्ध होणार आहेत. यात 240 एवढ्या संख्येतील अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश असणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना हे निर्देश दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
Corona patient in Thane | ठाण्यात कोरोना बाधित रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यू | ABP Majha