देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या बड्या नेत्यांना पराभूत केल्याचं चित्र सध्या तयार झालंय : जितेंद्र आव्हाड
अजित पवारांचा शपथविधी टीव्हीवर पाहिला त्यावेळी आपलं राजकीय आयुष्य संपलं असं वाटलं होतं. तसेच भाजपचा कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकत नाही. जितेंद्र आव्हाड एबीपी माझाच्या 'ऐसपैस' या कार्यक्रमात बोलत होते.
मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. एकीकडे ही चर्चा सुरु असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून भाजपच्या बड्या नेत्यांचा पराभव केला, असं चित्र सध्या तयार झालं आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच हे चित्र सावरताना भाजपला त्रास होईल, असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड एबीपी माझाच्या 'ऐसपैस गप्पा' या कार्यक्रमात बोलत होते.
भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजपचा पाया हलला आहे. विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागाला. यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचं चित्र सध्या तयार होत आहे. भविष्यात भाजपसाठी हे जड जाणारं आहे. भाजपमधील मोठे ओबीसी नेते आज एकमेकांच्या संपर्कात आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. पंकजा मुंडेंनी जर वेगळी भूमिका घेतली तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या परिश्रमाने या सर्वांना एकत्र आणलं होत. हे सगळे नेते आज अस्वस्थ असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.
अजित पवार पुन्हा तशी भूमिका घेणार नाहीत
राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्यादरम्यान अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका अॅक्शनला रिअॅक्शन होती. कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करायला मी सांगितलं नव्हतं. कार्यकर्ते चुकले, असं मी मानत नाही. शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ती भावना होती. अजित पवारांचा शपथविधी टीव्हीवर पाहिला त्यावेळी आपलं राजकीय आयुष्य संपलं, असं वाटलं होतं. मात्र पवार साहेबांनी काही वेळातच आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार आणि भाजप हे समीकरण कधीही जुळणार नाही, असंही जितेंद्र आव्हान यांनी सांगितलं. तसेच आताची परिस्थिती पाहता अजित पवार पुन्हा असा निर्णय घेतील, असं वाटत नाही, असंही आव्हाडांनी सांगितलं.
कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही
भाजपचा कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकत नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत फरक आहे. महाराष्ट्राचं राजकारण खरेदी-विक्री महासंघ होऊ शकत नाही. कर्नाटक, बिहार, आंध्रप्रदेश तामिळनाडूमध्ये असं अनेकदा घडलं आहे. एखाद्या माणसाला खरेदी करुन सरकार स्थापन करणे महाराष्ट्रात कधीही घडलेलं नाही आणि आताही तसं होणार नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.