एक्स्प्लोर
शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे बहुतांश नेते सकारात्मक, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार
शिवसेनेबरोबर जाण्याबाबत प्रत्येक नेत्याला काय वाटतं याची चाचपणी शरद पवारांनी आजच्या बैठकीत केली. बहुतांश नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत आग्रही भूमिका मांडल्याचे समजते. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत आता वेगाने हालचाली होण्याची शक्यता आहे. उद्या शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
पुणे : शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे बहुतांश नेते सकारात्मक असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादीची बैठक आज पुण्यात झाली. या बैठकीनंतर महाशिवआघाडीचं सरकार स्थापण्याच्या हालचाली वेगाने होणार असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या आठवड्यात सरकार लवकर स्थापण्याच्या संदर्भात दिल्लीत बैठका होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत शरद पवारांनी प्रत्येक नेत्याचे मत जाणून घेतलं. शिवसेनेबरोबर जाण्याबाबत प्रत्येक नेत्याला काय वाटतं याची चाचपणी शरद पवारांनी आजच्या बैठकीत केली. बहुतांश नेत्यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत आग्रही भूमिका मांडल्याचे समजते. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत आता वेगाने हालचाली होण्याची शक्यता आहे. उद्या शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
या भेटीत काँग्रेसनेही शिवसेनेबरोबर जाणं का गरजेचं आहे हे पवार सोनिया गांधी यांना पटवून देण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची बैठक होणार आहे.
लवकरात लवकर एक पर्यायी सरकार देणार : नवाब मलिक
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून लवकरात लवकर एक पर्यायी सरकार देण्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोचलो आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली. कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही कॉंग्रेससोबत आघाडी करुन लढलो होतो त्यामुळे कॉंग्रेससोबत चर्चा करुन पर्यायी सरकार देण्याबाबत विचारविनिमय झाला.या बैठकीत महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान उद्या सोमवारी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीमध्ये बैठक घेणार आहेत. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॉंग्रेसचे नेते यांची मुंबईमध्ये बैठक होणार असून यामध्ये चर्चा करुन पुढे काय करायचे आहे याची भूमिका ठरवली जाणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.
शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक उद्या
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार की नाही हे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका पार पडल्या आहेत. तिन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आहे.
या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा प्राथमिक अहवाल तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आला आहे. अहमद पटेल यांच्यामार्फत सोनिया गांधी यांच्याकडेही हा अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर उद्याच्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.
वेगवेगळ्या विचारसरणीचे हे पक्ष असल्याने सत्ता स्थापनेपूर्वी सर्व मुद्द्यांवर चर्चा करुण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करणे गरजेचं होतं. त्यामुळेच सर्व विषयांवर चर्चा करुन सत्ता स्थापन करण्यास उशीर होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र तिन्ही पक्षांमध्ये सुरु असलेली चर्चा सकारात्मक असल्याची माहिती तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाशिवआघाडीचं सरकार राज्यात येण्याची अपेक्षा जनतेला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement