सहकारी बँकांच्या कायद्यात केलेल्या बदलांबाबत मोदी-पवार बैठकीत चर्चा, नवाब मलिक यांची माहिती
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काल पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तर शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.
मुंबई : राजकारणातील दोन बड्या नेत्यांची दिल्लीतील भेट आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वात चर्चेचा विषय आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची आज दिल्लीत भेट झाली. जवळपास 57 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटींनंतर अनेक राजकीय तर्क लावले जात आहेत.
यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं. शरद पवार आणि नरेंद्र मोदी भेटीवरून चुकीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या भेटीनंतर सुरु झालेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही, असं नवाब मालिक यांनी म्हटलं. केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे सहकारी बँकांना मोठं नुकसान होत आहे. रिझर्व्ह बँकेला खूप अधिकार देण्यात आले आहेत. सहकारी बँकेतून एखादा व्यक्ती कर्ज घेतो, त्यावेळी महाराष्ट्रातील कायद्यानुसार अडीच टक्के शेअर कॅपिटल त्यांना घ्यावा लागतो. पण कर्ज परत केल्यानंतर आपली शेअर कॅपिटलची रक्कम परत मिळावी अशी त्याची अपेक्षा असते. पण नव्या नियमांनुसार ती परत मिळू शकत नाही.
यामुळे एखादा उद्योजक सर्व शेअर खरेदी करून बँकेवर कब्जा करू शकतो. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे. याविषयीचं निवेदन पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन मोदींनी शरद पवार यांनी दिलं आहे. नियमांतील बदलांमुळे सहकार बँकांना धोका आहे. याविषयी पंतप्रधानांसोबत फोनवर चर्चा झाली होती. आणि आज त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली, असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबाबतची कल्पना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची भेट केवळ बँकिंगमधील समस्यांबाबत होती, याची काँग्रेस नेत्यांनाही कल्पना आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट, एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा
शरद पवार संरक्षणमत्री राजनाथ सिंह यांनी आयोजित केलेल्या बैठकीतीतही उपस्थित होते. काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी हे देखील बैठकीला उपस्थित होते. सीमेवरील एकूणच तणावाची स्थिती यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. शरद पवार आणि मोदी यांची भेट नियोजित होती. पंतप्रधानांची वेळ मिळाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली.
Sharad Pawar meets PM Modi : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेऊनच भेट, सूत्रांची माहिती
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काल पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तर शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. सर्व पक्षातील नेत्यांना भेटणे गैर नाही, असं नेहमीच होत असतं. शरद पवार ज्येष्ठ नेते असल्याने पीयूष गोयल स्वतः त्यांना भेटायला आले होते.
देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. काल पंतप्रधान मोदी यांनी चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनविषयी चर्चा केली होती. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनासंदर्भात धार्मिक ठिकाणे आणि गर्दीच्या कार्यक्रमांविषयी एक राष्ट्रीय धोरण बनवण्याची मागणी केली होती. कारण वेगळ्या राज्यांतील वेगळ्या नियमांमुळे अडचणी होत आहेत. हा मुद्दाही शरद पवार यांनी पुन्हा चर्चेत आणला. लसींअभावी लसीकरणात अडथळा येत आहे. त्यामुळे लस पुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणीही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.