समीर वानखेडेंच्या मातोश्रींचे दोन मृत्यूचे दाखले; नवाब मलिकांकडून आरोपांचा नवीन बॉम्ब
Nawab Malik vs Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केले आहेत.
Nawab Malik vs Sameer Wankhede : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा नवीन बॉम्ब फोडला आहे. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. त्यामुळे आता आरोपांचं सत्र पुन्हा एकदा कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नवाब मलिकांनी यांनी सकाळी दोन ट्वीट केले. त्यातील पहिल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "मित्रांनो सतर्क राहा. ब्रेकिंग न्यूज येत आहे." त्यानंतर काही वेळातच मलिकांनी आणखी एक ट्वीट करत पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर निशाणा साधला. मलिक दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले की, "आणखी एक फर्जीवाडा... अंतिम संस्कार करताना मुस्लिम आणि सरकारी दस्तावेजांसाठी हिंदू? धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव." हा दावा करताना नवाब मलिकांनी काही कागदपत्रांचे फोटोही ट्वीट केले आहेत.
समीर वानखेडे यांच्या आई जायदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मनपाच्या डेथ रजिस्टरी रेकॉर्डमध्ये मुस्लिम अशी नोंद आहे, तर डेथ रेकॉर्डला हिंदू अशी नोंद असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. डेथ रजिस्टरमध्ये मृत्यू दिनांक 16 एप्रिल 2015 अशी नोंद आहे. यामध्ये मुस्लिम अशी नोंद झाली आहे. तर डेथ रिपोर्ट 17 एप्रिल 2015 रोजीचा आहे. यात जायदा वानखेडे यांची हिंदु असल्याची नोंद करण्यात आली आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.
अवघ्या 24 तासांत मनपाच्या दोन महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या नोंदी असल्याची बाब उघड झाली असल्याचं नवाब मलिकांचं म्हणणं आहे. डेथ रजिस्टरमध्ये मुस्लिम अशी नोंद असल्याशिवाय मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे ओशिवरा येथील कब्रस्तानात दफन विधी देखील पार पडला. जायदा वानखेडे यांचे डेथ रजिस्टर आणि डेथ रेकॉर्ड सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहेत.
दरम्यान, नवाब मलिकांनी केलेल्या या आरोपानंतर या प्रकरणात आता आणखी काय समोर येणार? आणि आता या आरोपांवर समीर वानखेडे काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.