येत्या सहा महिन्यात सुरू होणार जलवाहतूक; नवी मुंबई लवकरच मुंबई, अलिबाग, वसई-विरारला जोडली जाणार
बोटींमध्ये एकाच वेळेस 300 प्रवासी बसणार असून 80 फोरव्हीलर तर 75 टू व्हीलर जाऊ शकतात. सध्या या बोट टर्मिनलचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी बस पार्किंग, रेस्टॉरन्ट या सुविधा उपलब्ध असतील.
![येत्या सहा महिन्यात सुरू होणार जलवाहतूक; नवी मुंबई लवकरच मुंबई, अलिबाग, वसई-विरारला जोडली जाणार Navi Mumbai, which will start shipping Water transport in the next six months, will soon be connected to Mumbai, Alibag, Vasai-Virar येत्या सहा महिन्यात सुरू होणार जलवाहतूक; नवी मुंबई लवकरच मुंबई, अलिबाग, वसई-विरारला जोडली जाणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/07/fe4cd0f7f9f4376e635ff42041c15c6e_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. येत्या सहा महिन्यांत शहरात जलवाहतूक टर्मिनस पुर्नत्वास येणार असून जलवाहतुकीस सुरुवात होणार आहे. मुंबई, अलिबाग, ठाणे, उरण बरोबर कोकणालाही या जलवाहतुकीने जोडले जाणार आहे.
नवी मुंबई शहराला लागून खाडी किनारा असल्याने याचा जलवाहतुकीसाठी उपयोग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यासाठी खाडीमध्ये भव्य असे जलवाहतूक टर्मिनस उभा करण्यात आले आहे. नेरूळ येथील खाडीत सिडको कडून 110 कोटी खर्च करून हे बोटींचे टर्मिनल उभारण्यात आले आहे. या ठिकाणावरून गेट वे ॲाफ इंडिया, भाऊचा धक्का, मांडवा, अलिबाग, ठाणे, उरण, वसई विरार आदी भागात रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना मुंबईत 20 मिनिटात तर अलिबाग येथे एक तासाच्या आत पोहोचता येणार आहे.
या बोटींमध्ये एकाच वेळेस 300 प्रवासी बसणार असून 80 फोरव्हीलर तर 75 टू व्हीलर जाऊ शकतात. सध्या या बोट टर्मिनलचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी बस पार्किंग, रेस्टॉरन्ट या सुविधा उपलब्ध असतील. सध्या फक्त बोटीपर्यंत जाण्यासाठी लागणारे फेंडर आणि स्टेअरकेसचे काम बाकी आहे. येत्या 30 ॲाक्टोबरपर्यंत काम पूर्ण करणार असल्याचे सिडकोचे मुख्य अभियंता डॉ. के एम गोडबोले यांनी सांगितले.
ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे यांनी या जलवाहतूक टर्मिनलची सिडको अधिकारी आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून पाहणी केली. 2018 मध्ये सुरू झालेल्या या कामास पर्यावरण विभाग केंद्र सरकार, मॅंग्रोज डिपार्टमेंन्ट यांच्या आडथळ्यामुळे 15 महिने वेळ वाया गेला. मात्र खासदार विचारे यांनी केंद्रात पाठपुरावा केल्याने पर्यावरण विभागाकडून परवानग्या मिळण्यास मदत झाली.
सिडकोकडून बोट टर्मिनल उभा करण्यास आले असले तरी येथील ॲाफरेशन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून करण्यात येणार आहे. कोणत्या ठिकाणी बोटी सुटणार आणि त्याचे चार्जेस काय असतील हे मेरिटाईम बोर्ड ठरवणार आहे. दरम्यान बोट टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आल्याने येत्या काही दिवसात येथे रोरो सेवा बोट आणून ट्रायल केली जाणार असल्याचे मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)