Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, कसा असेल पोलिसांचा बंदोबस्त?
PM Narendra Modi to visit Mumbai: गुरुवारी सायंकाळी प्रवास करणार असाल तर ही बतमी महत्वाची आहे...
PM Narendra Modi to visit Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ( गुरुवारी 19 जानेवारी) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाने बैठका घेऊन त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसही सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे. प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्याशिवाय काही मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो काही कावालधीसाठी बंध असणार आहे.
गुरुवारी तुमची फ्लाइट चुकवायची नसेल तर तुम्हाला विमानतळावर लवकर जावं लागणार आहे. कारण व्हीव्हीआयपी मुव्हमेंटमुळे मुंबईच्या रस्त्यावर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत जड वाहतूक असेल. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, सांताक्रूझ जोगेश्वरी लिंक रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस रोड आणि इतर रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही मुंबई आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमानतळावरून उड्डाण घेण्याचा विचार करत असाल तर कोणतीही रहदारी टाळण्यासाठी लवकर पोहोचाव लागेल.
बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील उद्याच्या नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच 5.30 ते- 5.45 या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतुक संथ गतीने सुरू असेल. नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असं मुंबई वाहतूक पोलीसांनी ट्विट करून सांगितलं आहे. त्याशिवाय नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. वाहतूक विभागाच्या अधिकृत माध्यमांवरून मिळालेली माहितीच प्रमाण मानावी. आपल्याला कोणतीही समस्या अथवा शंका असल्यास आमच्याशी हेल्पलाईन क्रमांक अथवा ट्विटरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एम एम आर डी ए मैदान आणि मेट्रो सात मार्गिका गुंदवली आणि मोगरापाडा स्थानका दरम्यान ड्रोन, पॅरागलाईडर आणि रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोदींच्या दौर्याच्या दिवशी म्हणजेच गुरवारी सदर क्षेत्र उड्डाण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, मुंबई पोलिसांकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.
कसा असेल मुंबई पोलिसांचा बंदोबस्त -
मुंबई पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच पाच पोलीस उपायुक्त यावेळी हजर असतील. त्यांच्या मदतीला 27 एसीपी 171 पोलीस निरीक्षक आणि 397 अधिकारी हजर असतील. तर या संपूर्ण परिसरात बंदोबस्ताकरिता तब्बल अडीच हजार पोलीस अंमलदार आहेत, ज्यात 600 महिला पोलीस अंमलदार असतील. या सगळ्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या, दंगल विरोधी पथकाची एक तुकडी तसेच शीघ्र कृती दल देखील हजर असेल. स्वतः मुंबई पोलीस आयुक्त बंदोबस्तावर देखरेख ठेवणार असून त्यांच्या जोडीला स्पेशल सीपी आणि इतर सह पोलीस आयुक्त देखील असतील.