(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 7 डिसेंबर रोजी 'या' भागात पाणीपुरवठा खंडीत, काही ठिकाणी पाणी कपात
Water Supply Cut : 7 डिसेंबर 2023 रोजी मुंबईतील काही ठिकाणी पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. तर, काही ठिकाणी पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
Mumbai Water Cut : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मलबार हिल (Malabar Hill) जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने तज्ज्ञ समितीकडून पाहणी करण्यात येणार आहे. या कारणांनी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी 7 डिसेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा खंडीत लक्षात घेता मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी कामासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीमार्फत गुरूवार, दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक दोन ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक 2 रिक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे काही भागांत पाणीपुरवठ्यामध्ये पाणीकपात करावी लागणार आहे.
कधी होणार पाहणी?
गुरूवार, दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत या दोन तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यासाठी कप्पा रिक्त केल्याने, मुंबई शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
अशी होणार पाणी कपात
>> ‘ए’ विभाग-
कफ परेड आणि आंबेडकर नगर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 11.20 ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत)- या ठिकाणी 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहिल.
नरिमन पॉईट आणि जी. डी. सोमाणी – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 1.45 ते 3 वाजेपर्यंत) - पाणीपुरवठ्यात 50 टक्के पाणीपुरवठ्यात करण्यात येईल.
मिलिट्री झोन- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – 24 तास) – पाणीपुरवठ्यात 30 टक्के कपात करण्यात येईल.
मलबार हिल आणि आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे 'ए' विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) - पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येईल.
सी विभाग-
मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'सी' विभागातील सर्व क्षेत्र – पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येईल.
डी विभाग-
पेडर रोड- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी 1 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येईल.
मलबार हिल आणि आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'डी' विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येईल.)
जी उत्तर व जी दक्षिण विभाग-
जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग – पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येईल.
गुरुवारी, 7 डिसेंबर रोजी नमूद केल्याप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.