Mumbai Vaccination : तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत आजपासून लसीकरण सुरु
Mumbai Corona Vaccination : शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत आजपासून लसीकरण पुन्हा सुरु होणार आहे.
Mumbai Corona Vaccination : मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर आजपासून म्हणजेच, सोमवारी पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे. मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु असणार आहे. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील. कारण दररोज कोविशील्ड लसीचे 40-50 हजार डोस मुंबईकरांना दिले जातात. त्याच वेळी, कोवॅक्सिन लसीचे 15 हजार डोस दररोज दिले जातात. मंगळवारपर्यंत लसीचा पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. सध्या कोविशिल्डचे 85 हजार डोस आणि कोवॅक्सिनचे 50 हजार डोस उपलब्ध आहेत.
मुंबईतील कोरोना लसीकरण मोहीम शुक्रवारपासून ठप्प होती. पुरेशा लसींच्या साठ्याअभावी शुक्रवारी मुंबईतील लसीकरण बंद असेल असं मुंबई महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. तसेच शनिवारीही लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली होती. तर रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे लसीकरण बंद होतं. अशातच आज (सोमवारी) अवघ्या तीन दिवसानंतर मुंबईतील लसीकरण सुरु होणार असून आज सर्व लसीकरण केंद्र सुरु राहणार आहेत. यासंदर्भातील माहिती मुंबई पाकिलेच्या वतीनं देण्यात आली.
मुंबईत गेल्या 24 तासात 558 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 558 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 15 जणांचा कोरोनाने जीव गेला. मुंबईत आतापर्यंत 15 हजार 627 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्या मुंबईत 11 हजार 423 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यातील सध्याची कोरोना स्थिती
राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज 6 हजार 13 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 59,12,479 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के इतके झाले आहे.
देशभरातील लसीकरणाची माहिती
भारताच्या एकूण कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 37.60 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजता उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, एकूण 48,33,797 सत्रांमधून 37,60,32,586 लसीचे डोस देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 37,23,367 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 1.44 कोटींपेक्षा अधिक (1,44,03,485) लसींचे डोस उपलब्ध आहे.
देशात गेल्या 24 तासात 41,506 नवीन रुग्णांची भर
आरोग्य मंत्रालयानं सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 41,506 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 895 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शुक्रवारी देशात 42,766 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत देशात 41,526 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :