(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Vaccination : आज मुंबईत फक्त महिलांसाठी कोरोना लसीकरण विशेष सत्र, थेट केंद्रावर मिळणार लस, पूर्वनोंदणी बंद
Mumbai Vaccination : मुंबईत आज, शुक्रवारी 17 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असं विशेष कोविड 19 लसीकरण सत्र राबवण्यात येणार आहे.
Mumbai Vaccination : मुंबईत राहणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महापालिकेच्या वतीनं आज, शुक्रवारी (17 सप्टेंबर) सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवलं जाणार आहे. यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या पार्श्वभूमीवर आजसाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगानं आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत राबवलं जाणार आहे.
मुंबईतील सर्व 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयं आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणानं, आज साठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र काही दिवसांपासून वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 44 हजार 649 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली
मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4654 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1279 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 39 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.