Mumbai Travel Guidelines: महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आता संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि दुबईवरुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना  सात दिवसीय होम क्वारंटाईन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेनं नव्या ट्रॅव्हल गाइडलाइंस 17 जानेवारीपासून लागू केल्या आहेत. काल ट्वीट करत बीएमसीनं ही माहिती दिली आहे. 


बीएमसीनं म्हटलं आहे की,  मुंबईमध्ये संयुक्त अरब अमिरातसह दुबईहून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता सक्तीनं 7 दिवस होम क्वारंटाइन आणि आल्यानंतर RTPCR चाचणीत सूट देण्यात आली आहे.    29 डिसेंबर रोजी दुबईसह यूएईमधून आलेल्या प्रवाशांना मुंबईत आल्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाइन आणि आल्यानंतर RTPCR चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. 


मुंबईमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे चित्र


देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातही दररोज 40 हजारांच्या पुढे रुग्णसंख्येची नोंद होत आहे. अशातच मुंबईमध्ये मात्र, रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. बुधुवारी मुंबईत 16 हजार 420, गुरुवारी 13 हजार 702 , शुक्रवारी 11 हजार 317, शनिवारी 10,661 तर रविवारी मुंबईत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले होते.  त्यामुळे त्यात सातत्याने घट दिसून आली. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला असल्याचे मत राज्य सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं आहे.





मुंबईत सध्या रुग्णसंख्येत घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे कदाचीत तिसरी लाट येऊन गेल्याचे डॉ. शशांक जोशी म्हणाले. मागील काही दिवसांच्या तुलनेतील ही रुग्णसंख्या दिलासादायक असल्याने नागरिक आणि पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले असून जवळपास याहून तीनपटीने अधिक म्हणजेच 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली असल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. तर ही घोषणा करण्यापूर्वी किमान एक आठवडा आणखी परिस्थिती पाहिली पाहिजे, असे बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटले आहे.


 



इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha