Mumbai BJP Yuva Morcha Agitation : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या बंगल्याच्या बाहेर भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी सकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन सुरु केलं. विद्यापीठ कायद्याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी पहाटे 5 वाजता मंत्रालयासमोरील मंत्री उदय सामंत यांच्या घराबाहेर रांगोळी काढून निदर्शनं केली. यावेळी पोस्टरवरून पोलीस आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी महिलांनी महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाही दिल्या. आंदोलनादरम्यान भाजप युवा महिला मोर्चाच्या काही महिला कार्यकर्त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला धमकी देत ​​विद्यापीठ कायद्यात बदल न केल्यास आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करु, असं सांगितलं.


महाविकास आघाडी सरकारनं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळं भाजपचे युवा कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार विरोधात मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयाच्या समोर असलेला बंगल्या बाहेर आज पहाटे 5 वाजता भाजपाच्या युवा वतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आलं.


कुलगुरु यांचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आल्यानं त्याचा निषेध मुंबईत भाजपाच्या वतीने आंदोलनामार्फत करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकाचा विरोध करण्यात आला. यावेळी मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याच्या समोर मोठ्या संख्येमध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता. भाजप युवा महिलांच्या हातातील बॅनर पोलीस आणि महिलांमध्ये खेचाखेची झाल्याच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 


मात्र, यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला आव्हान करण्यात आलं आहे. सरकारनं जरी हा विधेयक कायदा मागे नाही घेतला तर महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक मंत्री, आमदार आणि खासदार यांच्या घराबाहेर अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी पोलिसांनी सर्व महिला भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं आहे. 


भाजपचा विरोध मला नसून नरेंद्र मोदींना : उदय सामंत  


पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) सांगतात की वंचित घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम प्रत्येक विद्यापीठात झालं पाहीजे. तेच काम आम्ही करत आहे. प्र. कुलपती नेमण्याची पद्धत केंद्र सरकारची आहे. ती आम्ही स्वीकारली असेल आणि भाजप त्याला विरोध करत असेल तर हा विरोध मला नसून नरेंद्र मोदी यांना आहे असे मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant)  व्यक्त केले आहे. 


सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेनंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ' प्र. कुलपती पदाविषयी मी फार डोळसपणे पाहतो. कारण राजकीय अड्डा हा शब्द प्रयोग भाजपने केलाय तो अतीशय महत्वाचा केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यापीठांच्या कायद्यात बदल करून मला राजकीय अड्डा बनवायचा आहे. मात्र, स्वत:चे राजकीय अड्डे उद्ध्वस्त होतील म्हणून युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पुढे करून मुख्यमंत्र्यांना पत्रे पाढवण्याचं षडयंत्र सुरू आहे अशी टीका मंत्री सामंत यांनी केली.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा