Ganeshotsav : गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर... मुंबई-ठाण्यासह राज्यभरात दीड दिवसाच्या गणेशाचं विसर्जन
Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत प्रत्येक वॉर्डमध्ये कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यता आली होती, तर पवई तलाव परिसरात पालिकेने इथे 40 कृत्रिम तलाव पॉट लावले होते.

मुंबई : गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर... असा जयघोष करत मुंबई, ठाण्यासह आसपासच्या महानगरांमधल्या दीड दिवसांच्या घरगुती गणपतीबाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं. मुंबई महापालिकेच्या 288 वॉर्डसमध्ये गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. ठाण्यातील मासुंदा तलावाच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.
मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरच्या मध्यावर असलेल्या पवई तलावात गणपती विसर्जनाला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. गेल्यावर्षी या तलावात दीड दिवसाचे अडीच हजार पेक्षा जास्त गणपतींचे विसर्जन झाले होते. तर मुंबईत साठ हजार पेक्षा जास्त गणपतींचे विसर्जन झाले होते. यंदा च्या वर्षी हा आकडा वाढू शकतो. पवई तलावात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जन पाहता पालिकेने इथे 40 कृत्रिम तलाव पॉट लावले होते.
ठाण्यात भक्तांचा उत्साह
ठाण्यासह कळवा ,मुंब्रा ,दिवा आणि घोडबंदर या ठिकाणीही कृत्रिम तलावांची निर्मिती करून पर्यावरणापूरक विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. ठाणे महापालिकेच्या वतीनं विविध ठिकाणी फिरत्या विसर्जन तलावांचीही सोय करण्यात आली होती. भिवंडी शहरासह ग्रामीण भागातही दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन आज उत्साहात संपन्न झालं. वऱ्हाळ देवी घाट, नदी नाका, गणेश घाट, कामतघर गणेश घाट यांसह भिवंडी ग्रामीण भागातील विविध घाटांवर भक्तांचा उत्साह दिसून आला.
अलसुरे येथे युवक पाण्यात बुडाला
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मंगेश पाटील नावाचा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच खेड तालुका प्रशासन देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. यात खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदतकार्यात समन्वय साधला.
मृत मंगेश पाटील हे भोस्ते पाटीलवाडीचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असल्याची माहिती देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरी यंदाच पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. हा गणपती नवसाचा असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


















