Mumbai Rain Updates: मुंबईत मान्सूनची तुफानी एन्ट्री; रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत, पहिल्याच पावसात दाणादाण!
Mumbai Rains Updates: सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख 11 जून आहे. यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे.

Mumbai Rains Updates: राज्यासह आता मुंबईत देखील मान्सून (Mumbai Rains Updates) दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे.
सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख 11 जून आहे. यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. यंदा पहिल्यांदाच मान्सून लवकर धडकला. मान्सूनने मुंबई दाखल होण्याचा रेकॉर्ड मोडला. मान्सून याआधी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईत लवकर धडकला आहे. मान्सून 26 मे रोजी मुंबई दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.
रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत-
मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे ते कल्याण जलद आणि धिमी वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तर काही काळ ठप्प झालेली हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र वाहतूक उशिराने सुरु आहे. याशिवाय सीएसएमटी स्थानकात एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्यांची वेळ बदलण्यात आलीय. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार आहे. तर सीएसएमटी-धुळे एक्सप्रेसही 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईतील पावसाचे सर्व अपडेट्स-
2.54 PM: माहिम येथे इमारत कोसळ्याची घटना...माहिम स्थानक परिसरातील एमएमसी (मिया मोहम्मद छोटणी रोड) क्रॉस ३ रोड ही दुर्घटना झाली असल्याची माहिती...हाजी कासम नावाची चाळ असल्याची माहिती...शिडी काढील भाग कोसळला असल्याची माहिती
2.40 PM: पोलखोल कशी काय? पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार? कंट्रोल रूम मधून सगळे स्पॉट पाहिले आता पाणी राहिलेले नाही. जून 10 तारखेनंतर पाऊस येतो तशी तयारी आपण करत असतो. नरिमन पॉइंटला 252 मिमी पाऊस पडला, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
2.37 PM: वरळीतील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाची आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी
2.35 PM: मेट्रो-3 कडून स्पष्टीकरण- मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भींत कोसळल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल). मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भींत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने यामुळे ती पडली. खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. मेट्रो-3 चे अभियंते आणि सुरक्षा चमू यावर युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
2.25 PM: दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील गोल देऊळ परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी...
2.22 PM: पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला...
2.12 PM: मुंबई पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मरिन लाईन लोकल स्थानकाच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाले. विद्युत वाहिनीवर झाड आल्याने त्याला देखील आग लागली.
2.00 PM: मुंबईत सकाळी 9 ते 10 दरम्यान ढगफुटीसदृश्य पाऊस...मुंबई महापालिकेच्या काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर एका तासात 80 मिमीहून अधिक पावसाची नोंद...तर दक्षिण मुंबईतील एका स्टेशनवर 104 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, आयएमडीनं सकाळी 9 ते 10 दरम्यान झालेला पाऊस हा ढगफुटी नसल्याचं सांगितलं आहे.आयएमडीकडून दक्षिण मुंबईतील त्या एका तासातील पाऊस हा अतिमुसळधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
1.30 PM: मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानात साचले पाणी
1.17 PM: मध्य रेल्वे अप फास्ट लाईन पूर्ववत झाली आहे आणि सावधानता पूर्वक वेगाने धावत आहे.
1.17 PM: मध्य रेल्वे डाऊन फास्ट लाईन पूर्ववत झाली आहे आणि सावधानता पूर्वक वेगाने धावत आहे.
1.15 PM : मुंबईतील वरळी परिसरातील भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी, मेट्रो सेवा बंद, भुयारी मेट्रोकडे जाणारं गेटही बंद
12.30 PM: मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला.
सीएसएमटी स्थानकातील एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी-
सीएसएमटी हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार
सीएसएमटी धुळे एक्सप्रेस देखील 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार
केम्स कॉर्नर ते मुकेश चौकच्या दरम्यान रस्ता खचला-
रस्ता खचल्यामुळे अप दिशेतील बस मार्ग क्रमांक 104, 121, 122 ,132,135 हे पेडर रोड, कॅडबरी जंक्शन ,भुलाबाई देसाई मार्गाने 10.30 वाजल्यापासून जे. मेहता कडे जातील.
पनवेल रेल्वे स्थानकावर पाणी साचले-
नवी मुंबई - पनवेल रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.
यामुळे प्रवाशांना स्थानकात येण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईत मे मधला 107 वर्षांतला विक्रमी पाऊस-
मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात 294 मिमी पाऊस
1918 च्या मे महिन्यात पडला होता 279 मिमी पाऊस
मुंबईत सकाळी 8.30 पर्यंतच्या 24 तासांत 135 मिमी पाऊस
मुंबईच्या उपनगरांत मात्र मे मध्ये आतापर्यंत 197 मिमी पाऊस
अलर्ट खरा ठरला, मुसळधार पावसाला सुरुवात-
आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात आज (सोमवार, 26 मे) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. रात्री धुवाधार सरी कोसळून गेल्यानंतर पुन्हा पहाटे पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील 3 तासांत मुंबई आणि उपनगरीय भागात मध्यम पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याची पाहायला मिळतेय.
महापालिकेची यंत्रणा सकाळपासूनच कामाला-
मुंबईत झालेल्या पावसामुळे काही भागांमध्ये पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, त्या भागांबाबत संबंधित वॉर्ड कार्यालयांशी संपर्क साधून पाणी काढण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. महापालिकेची यंत्रणा सकाळपासूनच कामाला लागली असून, पाणी उपसा व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईत सकाळी 9 वाजता अंधार-
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. तर दक्षिण मुंबईतही अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. तर अंधेरी, वांद्रे, गोरेगावर परिसरात सगळीकडे अंधार झालेला आहे.

























