Mumbai Rain : मुंबईत भर दुपारी अंधार, विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस
मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला.
मुंबई: मुंबईसह राज्यभरात (Mumbai Rain) एकीकडे गणेश विसर्जनासाठी (Ganapati Visarjan) धामधूम सुरु असताना, दुसरीकडे वरुणराजा तुफान बरसला. मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून येऊन तुफान पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. याआधी हवामान विभागानेही पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता.
मुंबईत भर दुपारी अंधार पसरला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. या भर पावसातही अनेक गणेश मंडळांनी आपल्या मिरवणुका चालूच ठेवल्या. मुंबईच्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची गर्दी आणि कोसळणारा पाऊस असं चित्र होतं. अंधेरी परिसरात पावसाचा जोर इतका होता की त्यामुळे दृष्यमानताही कमी झाली. त्याशिवाय विजांचा कडकडाटही भीतीदायक होता.
दादर चौपाटीवर मुसळधार पाऊस
दरम्यान, तिकडे दादर चौपाटीवरही मुसळधार पाऊस कोसळला. एकीकडे गणपती विसर्जनासाठी गणेश मंडळांची धामधूम सुरु होती. त्यातच मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. एकीकडे गणेश विसर्जन होत असताना दुसरीकडे मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. दादर परिसरात गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठी आहे. जोरदार पाऊस कोसळत असताना सुद्धा मुंबईकरांचा उत्साह मात्र मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. यंदा समुद्र चौपाटीवर सर्वसामान्य नागरिकांना जायला बंदी करण्यात आली असून, मुंबई महानगरपालिकेचे जीव रक्षक दलाचे कर्मचारी गणपती बाप्पाची मूर्ती हातात घेऊन स्वतः समुद्रात जाऊन विधिवत विसर्जन करत आहेत.
हवामानाचा अंदाज
दरम्यान, हवामान विभागाने आज राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार दुपारनंतर राज्याच्या विविध भागात पाऊस बरसला. महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज होता. तो वरुणराजाने खरा ठरवला.
याशिवाय कर्नाटक, गोवा आणि केरळ किनारपट्टी भागात हलका तो जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Thunderstorm alert for #Mumbai for next 2-3 hours ⚠️
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) September 28, 2023
Panvel, Navi Mumbai will get intense rain as a fresh thunderstorm has developed near the ghats
Central line near Thane, will get heavy rain in next hour ⛈️
Expecting 30-40 mm in an hour, rain will be more in the interiors.… pic.twitter.com/avqmRtKeoG