Mumbai: CSMT रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; 2400 कोटी खर्च करुन स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार
Mumbai: मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे, त्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च केले जाणार आहेत.
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. नव्या वर्षापासून सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाला सुरुवात होणार आहे. प्रवाशांसाठी आता अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे, त्यासाठी 2 हजार 400 कोटी खर्च केले जाणार आहेत. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतींना धक्का लागू देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सीएसएमटीबरोबरच देशातील 1 हजार 250 रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसएमटीला जागतिक दर्जाचे मल्टिमॉडेल हब बनवण्याचा प्रस्ताव भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) तयार केला आहे.
मध्य रेल्वेचं मुख्यालय असलेली ही वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. गॉथिक शैलीतील रेल्वे स्थानकाची ही इमारत जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. 2008 पासून सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम हाती घेण्याचं सुरू आहे. मात्र, जागतिक वारसा लाभलेल्या या परिसराचं काम करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या आणि त्यामुळे त्याची मंजुरी आणि अन्य प्रक्रियांमध्ये बराच कालावधी गेला. मात्र, आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या हेरीटेज दर्जाला हात न लावता हे स्थानक पुर्नविकास करण्यात येणार आहे.
सीएसएमटी स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार
सीएसएमटी येथे मेल-एक्स्प्रेस आणि लोकलसाठीचं स्वतंत्र टर्मिनस आहे. तेथे प्रवाशांना वावरण्यासाठी मोकळी जागा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकाला लागूनच असलेल्या अॅनेक्स इमारतीसमोरचा टॅक्सी स्टॅण्ड हटवण्यात येणार आहे. येणार्या प्रवाशांसाठी मोकळी जागा आणि बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाणार आहे. तसंच ऐतिहासिक सीएसएमटी इमारत पाहण्यासाठी हेरिटेज गॅलरी उभारण्यात येणार आहे. मशिद बंदर स्थानकाच्या दिशेला लोकल आणि लांब पल्ल्याच्या मार्गिकांच्या यार्डचं नूतनीकरण करण्यात येईल. विमानतळाच्या धर्तीवर स्टेशनवर दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठीचे सेवाशुक्ल तिकीटमध्येच समाविष्ट केले जाणार आहेत, त्यामुळे भविष्यात तिकीटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्यं
- सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून होणारा स्टेशनचा पुर्नविकास
- स्टेशनला मुंबईचे मध्यवर्ती रेल मॉलप्रमाणे विकसित केलं जाणार
- रेल्वे स्टेशन आणि स्टेशनलगतची जागा व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी विकसित होणार
- 2.54 लाख चौरस मिटरची जागा व्यावसायिक वापरासाठी
- विमानतळाच्या धर्तीवर स्टेशनवर संपूर्ण सुविधा मिळणार
- तिकिटामध्ये स्टेशनवरील सेवा शुक्लाचा समावेश करणार
- पुर्नविकास करताना पर्यावरण आणि इतर गोष्टींचा विचार होणार
- सीएसएमटी स्थानकाच्या हेरीटेज दर्जाला हात न लावता होणार पुर्नविकास
हेही वाचा: