(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉ. आंबेडकरांच्या राजगृहाच्या बागेत नासधूस, प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (7 जुलै) दोन अज्ञातांनी नासधूस केली. प्रकाश आंबेडकर यांनी शांततेचं आवाहन केलं असून गृहमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं.याशिवाय राज्यातील इतर नेत्यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (7 जुलै) दोन अज्ञातांनी नासधूस केली. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या तसंच घरातील कुंड्यांचीही नासधूस केली. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचंही नुकसान झालं आहे. माटुंगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे. मुंबईच्या दादरमधल्या हिंदू कॉलनी परिसरात त्यांचं हे निवासस्थान आहे. पुस्तकांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर बांधलं होतं. बाबासाहेबांचे जगभरातील अनुयायी या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.
राजगृहाच्या आजूबाजूला जमू नका, शांतता राखा : प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर यांनी यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. ते म्हणाले की, "मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं काम चोख केलं. जनतेने शांतता राखावी आणि राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये, अशी विनंती मी करतो."
राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. 'राजगृह' आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी. pic.twitter.com/P31MTvJhb4
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 7, 2020
दोषींवर कठोर कारवाई करणार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे की, "दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.
दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 7, 2020
'राजगृह' तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून : उपमुख्यमंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या 'राजगृह' निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
भ्याड हल्ल्याचा निषेध, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : जितेंद्र आव्हाड राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून गृहमंत्र्यांना विनंती आहे की, सखोल चौकशी होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राजगृह हे डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. आम्हा आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असुन गृहमंत्र्यांना विनंती सखोल चौकशी होवुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी @AnilDeshmukhNCP
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 7, 2020
भ्याड हल्ल्याचा निषेध, माथेफिरुंना अटक करा : धनंजय मुंडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' ही आमची अस्मिता आहे. माथेफिरुंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरुंना अटक करुन कठोर कारवाई करावी !जय भीम!, असं धनंजय मुंडे म्हणाले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. मी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. @AnilDeshmukhNCP यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी ! जय भीम !
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 7, 2020
पवित्र वास्तूची तोडफोड होणं अतिशय संतापजनक : सुप्रिया सुळे "दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या 'राजगृह' येथे काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. या पवित्र वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या 'राजगृह' येथे काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. या पवित्र वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध. @AnilDeshmukhNCP
— Supriya Sule (@supriya_sule) July 7, 2020
प्रेरणास्थानाची तोडफोड करणाऱ्याला तात्काळ अटक करा : नाना पटोले विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृह यावर अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. मी सदर घटनेचा निषेध करतो. राजगृह हे सर्वांचं प्रेरणास्थान आहे. अशा प्रेरणास्थानाची तोडफोड करणार्याला तत्काळ अटक करावी व कडक कारवाई करावी.
विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृह यावर अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. मी सदर घटनेचा निषेध करतो.
राजगृह हे सर्वांचा प्रेरणास्थान आहे अश्या प्रेरणास्थान ची तोडफोड करणार्या ला तत्काळ अटक करावी व कडक कारवाई करावी.#rajgruh — Nana Patole (@NANA_PATOLE) July 7, 2020
राजगृहावरील घटनेचा तीव्र निषेध : संभाजीराजे छत्रपती "भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर दगडफेक करणाऱ्यांना शोधून तात्काळ कार्यवाही शासनाने केली पाहिजे. या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. आजही महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या संस्कारांनी चालतो. महापुरुषांच्या नावाची विटंबना रोखणारा नवीन कायदा शासनाने त्वरित तयार करून अंमलबजावणी करावी. त्यामुळे असे समाज विघातक कृत्ये थांबतील," असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय
Dr BR Ambedkar's house | डॉ. आंबेडकरांच्या 'राजगृह' निवासस्थानावार अज्ञात व्यक्तींकडून तोडफोडमहापुरुषांच्या नावाची विटंबना रोखणारा नवीन कायदा शासनाने त्वरित तयार करून अंमलबजावणी करावी. त्यामुळे असे समाज विघातक कृत्ये थांबतील.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 8, 2020