मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय? वाढत्या प्रदूषणाचा आर्थिक राजधानीला फटका, आरोग्यावर परिणाम
Mumbai Pollution : मुंबई (Mumbai) शहरावर धूसर हवेच सावट आल्याने मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक राजधानीचं स्वास्थ्य आता बिघडू लागलं आहे का? असाही प्रश्न निर्माण होतोय.
Mumbai Pollution : मुंबई (Mumbai) शहरावर धूसर हवेच सावट आल्याने मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक राजधानीचं स्वास्थ्य आता बिघडू लागलं आहे का? असाही प्रश्न निर्माण होतोय. कारण, मुंबईत मागच्या अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता बिघडली आहे. याचा फटका थेट मुंबईकरांना बसला आहे. मुंबईत पायाभूत सुविधा, नवे विकास प्रकल्पाची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यातून तयार होणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत आहे. याच जोडीला वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म कण असतात. या कारणांमुळं मुंबईच्या हवेवर परिणाम होत आहे.
महापालिका प्रशासन मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी अॅक्टिव मोडवर आली आहे. आतापर्यंत महापालिकेने हवेची गुणवत्ता सुधारावी म्हणून रस्ते धुण्यास सुरू केले आहेत. अधिक कचरा आणि मोडतोड गोळा करुन प्रक्रिया सुविधेकडे नेण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्यावर क्लिन अप मार्शल उभे केले आहेत, तसेच यांत्रिक पद्धतीने स्वीप ड्राइव चा ही वापर केला जात आहे, वार्ड निहाय स्कॉड तयार केले आहेत आणि त्याचा रिपोर्ट दर आठवड्याला सहआयुक्तांना देण्याचे आदेश पालिकेने दिले आहे.
मुंबईच्या हवेची गुणवत्ता थेट मुंबईकरांच्या स्वास्थ्याला हानिकारक
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या हवेची गुणवत्ता थेट मुंबईकरांच्या स्वास्थ्याला हानिकारक ठरत आहे. धुळीचे कण, धूसर वातावरण, हानिकारक हवा यातून मुंबईकरांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हवेत नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनॉक्सिड, सल्फर डायॉक्सिड असे हानिकारक वायू आहेत. ते श्वाच्छोश्वास प्रक्रियेवेळी थेट नाकावाटे फुप्फुसात जात आहेत. त्यामुळं अनेक आरोग्याचे त्रास होऊ शकतात.
प्रदूषण नियंत्रणात राहावं यासाठी महापालिकेकडून नियमावली आणि मार्गदर्शक तत्व
मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात राहावे त्यासाठी महापालिकेने नियमावली आणि मार्गदर्शक तत्व दिली आहेत. मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होत आहे. मुंबईतील 28 बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उल्लंघन महापालिकेने कारवाईच्या लेखी सूचना दिल्या आहेत. प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये मिळून 868 बांधकामांच्या ठिकाणी पथकांनी भेटी दिल्या आहेत तर उर्वरित बांधकाम ठिकाणचे वेळापत्रक तयार केले आहे.
पालिकेनं 276 जणांना पाठवली नोटीस
मुंबईत भंगार लाकूड आणि कोळश्यापासूनही धुराचे लोट मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळं अनेक हानिकारक वायू बाहेर पडतात असे निरीक्षण पालिकेने नोंदवत 276 बेकरी चालकांना पालिकेच्या पर्यावरण विभागाने नोटीस बजावली आहे. यासोबतच लाकूड आणि कोळश्याच्या वापरण्यामुळं होणारे तोटे आणि सीएनजी इंधन किंवा इलेक्ट्रिक शेगड्यामुळं होणारे फायदे यामधील फरक सांगण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. पालिकेच्या नोटीसला आम्ही मान्य करु आणि राज्यात प्रदूषण कमी करण्यास हातभार लावू असे मत बेकरी चालकांनी मांडले आहे.
हवामान विभागानं नेमकी काय दिली माहिती?
29 तारखेनतंर हवामान सर्वसाधारण होईल. हिवाळ्यात दृष्यमानता कमी होते, हवेची दिशा आणि वारे कमी वेगाने वाहिले त्यामुळं मुंबईत काल धुरकट वातावरण दिसल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्र प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली आहे. त्यामुळे पार्टिकल्स हवेत पाहायला मिळालेत. मात्र, आता पुन्हा एकदा वातावरण सर्वसाधारण दिसू शकेल. मुंबईत 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमान दिसू शकेल असेही ते म्हणाले.
प्रदुषणासंदर्भात मी स्वतः लक्ष घालणार : पंकजा मुंडे
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर तर राज्याच्या हवामानातील बदलावर चिंता व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे मेट्रोसिटी आहेत आणि येथे प्रदूषण वाढलेलं आहे याची अनेक कारणं आहेत. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे, त्यामुळं हे काही वेळ प्रदूषण असेल. यामध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे. शिवाय अनेक कारखान्यांकडून प्रदूषण होत आहे, याकडे मी लक्ष देणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.