Ravi Rana and Navneet Rana : राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस; 8 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
Ravi Rana and Navneet Rana : राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस. 8 जून रोजी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस
Ravi Rana and Navneet Rana : रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस धाडली आहे. 8 जून रोजी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतील खार पोलीस स्थानकानं 4 जून रोजी ही नोटीस राणा दाम्पत्याच्या मुंबई वांद्र्यातील निवासस्थानी पाठवली होती.
राणा दाम्पत्याविरोधात आरोपपत्र दाखल करत असताना खार पोलिसांनी जोडप्याला 8 जून रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे. पोलिसांनी या जोडप्याला हजर राहण्याचे निर्देशनोटीशीतून दिले आहेत. दरम्यान, यापूर्वी राणा दाम्पत्यानं महाविकास आघाडी सरकारसोबतच मुंबई पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. राणा दाम्पत्यानं कोठडी आणि लॉकअपमध्ये असभ्य वागणूक दिल्याबद्दल पोलिसांवर विविध आरोप केले होते.
मुंबई खार पोलीस बुधवारी 8 जून रोजी राणा दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर पहारा दिला. तसेच, राणा दाम्पत्याच्या वांद्र्यातील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी घेराव घातला होता.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याविरोधात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि आयपीसी कलम 124 (अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करुन न्यायलयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तब्बल 12 दिवसांनी दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता.
नोटीस म्हणजे, मुख्यमंत्र्यांची खेळी : रवी राणा
मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटीशीबाबत बोलताना रवी राणांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त यांनी पोलिसांमार्फत नोटीस पाठवली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा घणाघाती आरोप रवी राणा यांनी केला आहे.