IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वीच मुंबई पोलिसांना धमकी; वानखेडेवर मोठ्या घटना घडण्याचा दावा
IND vs NZ : वानखेडेवरच्या सामन्यात मोठ्या घटना घडणार असल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीनं ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केलं आहे.
![IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वीच मुंबई पोलिसांना धमकी; वानखेडेवर मोठ्या घटना घडण्याचा दावा Mumbai police threatened before ICC World Cup 2023 IND vs NZ semi final match Claims of major incident at wankhede stadium Know More Details IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वीच मुंबई पोलिसांना धमकी; वानखेडेवर मोठ्या घटना घडण्याचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/10860c965a4e3d9a51eb49589e59d36f1692701193986428_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ICC World Cup 2023, IND vs NZ : मुंबईतील (Mumbai News) ऐतिहासिक वानखेडेवर आज सेमीफायनलचा महासंग्राम रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्या टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यादरम्यान काही मोठ्या घटना घडतील, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना दिली आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
वानखेडेवरच्या सामन्यात मोठ्या घटना घडणार असल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीनं ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केलं आहे. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा मेसेज देणारा फोटोही धमकीच्या मेसेजसोबत पोस्ट करण्यात आला होता.
मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त
दिवाळीची सुट्टी आणि त्यात इंडिया विरोधात न्यूझीलंडचा क्रिकेट सामना आणि तेसुद्धा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. याचा जल्लोष देशभरात पाहायला मिळणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुंबईत हा क्रिकेट सामना असल्यानं मुंबईत याचा आज जल्लोष असणार आहे. मुंबई पोलीस सज्ज झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांनी या सर्व परिसरात बॅरिकेटिंग केली असून वानखेडे स्टेडियमच्या आत जाणाऱ्या सर्व गेटच्या रोडवर झिरो पार्किंग करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आज मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर येत असल्यानं मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून याची तयारी करत आहेत. मुंबई पोलिसांतर्फे आव्हानसुद्धा करण्यात आलेलं आहेत की, नागरिकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा कारण या परिसरात पार्किंगसाठी खूप कमी जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना चर्चगेट आणि मरीन लाईन्स या स्टेशनवरून स्टेडियमच्या गेटपर्यंत जाण्यासाठी फुटपाटमार्ग बॅरिकेट लावून व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सेमीफायनलसाठी वानखेडे सज्ज
मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी. या सामन्यात यजमान भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. भारतानं विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उभय संघ वानखेडेच्या मैदानात आमनेसामने येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)